४० हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 07:37 PM2019-10-19T19:37:28+5:302019-10-19T19:38:57+5:30
अखंड पाठाची समाप्ती : संतांनी घेतले समाधीचे दर्शन
जळगाव : वर्सी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुग्रंथ साहेब व धुनी साहेब यांच्या अंखड पाठाची (भोग साहब) समाप्ती शनिवारी सायंकाळी झाली. यानिमित्त दुपारी आयोजित महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ ४० हजार भाविकांनी घेतला.
अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट व पूज्य सिंधी पंचायत यांच्यावतीने पू़ संत कंवरराम यांचा ६२ वा वर्सी महोत्सव, संत बाबा हरदासराम साहब यांचा ४२ वा तर संत बाबा गेलाराम साहब यांचा ११ वा वर्सी महोत्सव १७ तारखेपासून सुरु झाला असून महोत्सवाचा समारोप २० आॅक्टोबर रोजी होत आहे. यानिमित्त सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ परिसरात विविध कार्यक्रम सुरु आहेत.
शनिवारी पहाटे ५ वाजता देवरी साहेब पंचामृत स्रानाने कार्यक्रमाला सुरूवात झाली़ नंतर ११ वाजेच्या सुमारास संत साई राजेशकुमार व संत बाबा गेलाराम साहेब यांचे शिष्य भाई देविदास साहेब यांच्याहस्ते ध्वज पूजन करण्यात आले. शनिवारी देखील भक्तांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी उसळली होती़ तर बाहेरगावाहून आलेल्या संतांनी सुध्दा भक्तीभावाने समाधींचे दर्शन घेतले़ महोत्सवामुळे कंवरनगरात भक्तिमय वातावरण पसरले आहे़
भोग साहेबानिमित्त ठेवली दुकाने बंद
शनिवारी दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास भोग साहेबनिमित्त महाप्रसादाचे अर्थात भंडाºयाचे आयोजन करण्यात आले होते़ सुमारे ४० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला़ दरम्यान भोग साहेबनिमित्त शहरातील बहुतांश सिंधी बांधवांनी आप-आपली दुकाने बंद ठेवीत महोत्सवात सहभागी झालेले होते़ रात्री अखंड पाठाची समाप्ती झाली़ गेल्या तीन दिवसांपासून अखंड पाठ केला जात होता.
पल्लव साहेबाने आज महोत्सवाचा समारोप
रविवारी ११ वाजेच्या सुमारास वर्सी महोत्सवाचा समारोप हा पल्लव साहेब (प्रार्थना) या कार्यक्रमाने होणार आहे़ या कार्यक्रमात संतांच्या माध्यमातून परमेश्वराला सर्वाना सुख-समृध्दी लाभो, विश्वभरात शांती रहो, सगळ्यांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे़ ही प्रार्थना संत साई राजेशकुमार, देविदास भाई, साई बलराम, साई पहलाजराय आदी संतांच्या उपस्थितीत होणार आहे.