जळगावात चांदी हजार रुपयांनी घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:36 PM2018-06-22T23:36:49+5:302018-06-22T23:40:57+5:30
चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांची घसरण झाली असून भाव ४० हजार ५०० रुपयांवर आले आहेत. सोन्याच्याही भावात आठवडाभरात ५०० रुपयांनी घसरण झाली असून सोने ३१ हजारांवर पोहचले आहे.
जळगाव : चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांची घसरण झाली असून भाव ४० हजार ५०० रुपयांवर आले आहेत. सोन्याच्याही भावात आठवडाभरात ५०० रुपयांनी घसरण झाली असून सोने ३१ हजारांवर पोहचले आहे.
गेल्या महिन्यात ब्राझील, लंडन येथून आवक कमी झाली असताना अधिक मासामुळे चांदीला चांगलीच मागणी होती. त्यामुळे चांदीला चकाकी येऊन चांदीचे भाव ४१ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र अधिक महिना संपल्यानंतर चांदीला मागणीही कमी झाली.
औद्योगिक मागणी घटली
सध्या सुवर्ण बाजारात मंदीचे वातावरण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात लग्न तिथीही जास्त नसल्याने सोने-चांदीला उठाव नाही. त्यामुळे औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने मोठ्या व्यापारी व उद्योजकांनी सोने-चांदी खरेदीत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे वरील दोन्ही कारणांनी मागणी घटून अधिक मासाच्या तुलनेत आता केवळ ५० टक्केच ग्राहकी असल्याचे सुवर्ण बाजारात चित्र आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या आवकवर परिणाम झाला होता. आता कोणत्याही घडामोडी नसल्या तरी ग्राहकीच नसल्याने त्याचा फटका सुवर्ण बाजारावर होत असल्याचे चित्र आहे.
दोन आठवड्यात चांदीत १३०० रुपयांनी घसरण
५ जून रोजी ४१ हजार ८०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात हळूहळू घसरण सुरू झाली. दोन आठवड्यात १३०० रुपयांनी घसरण होऊन चांदी ४० हजार ५०० रुपयांवर आली. ४१ हजार ८०० रुपयांवर ती ४१ हजार ५०० रुपयांवर आल्यानंतर २० जूनपर्यंत ती याच भावावर स्थिर राहिली. त्यानंतर २१ रोजी थेट एक हजार रुपयांची घसरण झाली व चांदी ४० हजार ५०० रुपयांवर आली. २२ रोजीदेखील याच भावावर चांदी स्थिर होती.
सोनेही आठवडाभरात ५०० रुपयांनी घसरले
सोन्यालाही मागणी नसल्याने त्याचेही भाव दररोज घसरत आहे. १५ जून रोजी ३१ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात घसरण सुरू होऊन १६ रोजी ते ३१ हजार ३०० रुपयांवर आले. त्यानंतर २० रोजी ३१ हजार १५० आणि २१ रोजी ३१ हजार रुपयांपर्यंत सोन्याचे भाव घसरले.