प्रांताधिकाऱ्यांना धमकी, भूषण सपकाळेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल!
By अमित महाबळ | Published: September 24, 2023 07:37 PM2023-09-24T19:37:31+5:302023-09-24T19:38:33+5:30
त्याची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली आहे.
अमित महाबळ, जळगाव : हद्दपारीच्या कारवाईनंतर प्रांताधिकाऱ्यांवर ‘दबंगगिरी’ करणाऱ्या वाळूमाफिया भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२) याच्या विरोधात रामानंद पोलिसात शनिवारी रात्री उशिरा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी भूषणला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांनी रामानंद पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला आहे. त्यानुसार शुक्रवारी भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२) याने मोबाईलवरुन सुधाळकर यांच्याशी धमकावणारा संवाद केला. तसेच त्यांच्या शासकीय निवासस्थानावर जात हद्दपारीच्या कारवाईविषयी धमकावण्याची भाषा वापरली. हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर टाकल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी तातडीने दखल घेतली आणि डीवाय.एस.पी. संदीप गावित यांच्याकरवी प्रांताधिकाऱ्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर शहरातील पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भूषणचा शोध जारी केला होता. त्यानुसार शनिवारी सकाळी पोलिसांनी भूषणला ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली आहे. रामानंद पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याच्या नोंदही झाली आहे.
प्रांताधिकाऱ्यांची काय होती तक्रार...
प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांनी रामानंद पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे. त्यात नमूद केले आहे की, शुक्रवारी निवडणूक केंद्राची पाहणी करीत असताना हद्दपार केलेल्या भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२) याने मोबाइलवरून सुधाळकर यांच्याशी संपर्क साधला. भीती निर्माण होईल आणि धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत त्याने संवाद साधला आणि काय कारवाई केली याची विचारणा केली. सुधाळकर यांनी उद्या कार्यालयात येऊन आदेशाची प्रत घेऊन जा, असे सांगत फोन कट केला. त्यानंतर सपकाळेने एका सहकाऱ्यासोबत शुक्रवारी रात्री प्रांताधिकाऱ्यांचे निवासस्थान गाठले. गेटवरच्या शिपायाला दूर सारत ‘साहेब, कुठे आहेत, असा सवाल केला. सुधाळकर सामोरे गेल्यावर पुन्हा दहशत निर्माण करणारी भाषा वापरली. त्यानंतर परत जाताना ‘दरवाजा उघडा ठेव, पुन्हा येतो, अशा शब्दात शिपायाला सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क
सुधाळकर यांनी घडलेल्या प्रकाराविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर डीवाय.एस.पी. संदीप गावीत तत्काळ सुधाळकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. त्यानंतर भूषणचा शोध जारी झाला.