पलंगावरून खाली उतरली तर ठिक नाही तर फेकून देऊ, जळगाव जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेची प्रसूत महिलेला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:52 PM2018-09-21T12:52:12+5:302018-09-21T12:53:06+5:30
धक्कादायक प्रकार
जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती झालेल्या तालुक्यातील नंदगाव येथील सुखाबाई संतोष मालचे (३५) या महिलेला परिचारिकेनेच प्रसूती कक्षातून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. सारखा तगादा लावत ‘तू पलंगाच्या खाली उतरली तर ठिक नाही तर तुला फेकून देऊ’अशी धमकीही परिचारिकेने दिल्याने सिझेरियन झालेल्या या महिलेने संपूर्ण रात्र व्हरांड्यात उघड्यावर काढली. या अमानुष प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकाराचा जिल्हा रुग्णालयाच्यावतीने इन्कार करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखाबाई मालचे या महिलेला जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी या महिलेची प्रसूती झाली. सिझेरियन झाल्याने या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बुधवारी रात्री एका परिचारिकेने पलंगावरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र प्रसूती होऊन तीनच दिवस झालेले असताना व नवजात बाळही शिशू कक्षात असताना तेथून कसे जाणार असा प्रश्न महिलेला पडला. तरीदेखील परिचारिकेने या महिलेकडे तगादा सुरूच ठेवला. अखेर बुधवारी रात्री बारा वाजता दुसऱ्या महिलेला पलंगावर टाकायचे असल्याने तू पलंगाच्या खाली उतरली तर ठिक नाही फेकून देऊ अशी धमकी दिली व कक्षातून बाहेर काढून दिले.
११ तास उघड्यावर
कक्षातून बाहेर काढून दिल्याने नाईलाज म्हणून ही महिला जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनानजीक असलेल्या व्हरांड्यात खालीच झोपली. सोबत असलेली नातेवाईक महिलाच या प्रसूत महिलेजवळ थांबून होती. रात्री १२ ते सकाळी ११ असे तब्बल ११ तास या सिझेरियन झालेल्या महिलेला उघड्यावर काढावे लागले.
धक्कादायक प्रकाराबद्दल संताप
या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसच्या महिला अघाडीच्या शहराध्यक्षा अरुणा पाटील तसेच एकलव्य आदिवासी क्रांतीदलाचे जिल्हाध्यक्ष अरुण मोरे व इतर मंडळी जिल्हा रुग्णालयात पोहचले. या बाबत अरुणा पाटील व अरुण मोरे यांनी याबाबत जिल्हा रुग्णालयात चौकशी केली असता ती परिचारिका रात्रपाळीला होती. सकाळी ती रुग्णालयात नसल्याने तिला बोलविण्याची मागणी करण्यात आली.
या दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांनी व्हरांड्यात येऊन या महिलेला कक्षात हलविण्याच्या सूचना दिल्या. त्या वेळी सकाळी ११ वाजता प्रसूत महिलेला पुन्हा कक्षात हलविण्यात आले.
नवजात बाळाबाबत विचारणा नाही
प्रसूत महिलेला बाहेर काढले तरी तिचे नवजात बाळ कसे राहणार याचा विचार त्या परिचारिकेने केला नसल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला.
उद्धटपणाची वागणूक
प्रसूती कक्षात असलेल्या इतर रुग्णांच्या नातेवाईक महिलांनीही रुग्णालयातील वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. सलाईन लावायची किंवा अन्य काही काम सांगितले तर परिचारिका उद्धटपणे बोलतात, अशा तक्रारी काही महिलांनी मांडल्या.
पैशांची मागणी
साफसफाईच्या नावावर येथे कर्मचारी प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाकडे २०० रुपये व कपडे बदलविण्यासाठी १०० रुपये मागतात, असा आरोपही महिलांनी केला.
कटू-गोड अनुभव
रुग्णालयात काही परिचारिका उद्धटपणे वागत असल्या तरी काही परिचारिका अत्यंत काळजी घेतात, असेही काही अनुभव महिलांनी सांगितले. त्यामुळे चांगले काम करणाºया परिचारिकांप्रमाणे इतरांनीही योग्य वागणूक द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जागेच्या समस्येमुळे नेहमीच तक्रारी
जिल्हा रुग्णालयात १०० खाटांचा प्रसूती कक्ष आहे. दररोज या ठिकाणी २० ते २५ प्रसूती होतात. त्यात सिझेरियन झाल्यानंतर महिलांना चार ते पाच दिवस उपचारासाठी रुग्णालयातच ठेवावे लागते. त्यामुळे जागेचा मोठा प्रश्न निर्माण होऊन बºयाच वेळा एका पलंगावर दोन रुग्णांना टाकावे लागते. आता वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने रुग्णांचा ओघ वाढला असून रुग्णालयातून प्रसूतीनंतर जाणाºया महिलांची संख्या कमी व येणाºया महिलांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नेहमीच अशा समस्या उद््भवत आहे.
नंदगावच्या महिलेला कक्षातून कोणी काढले नव्हते. ती स्वत:हून खाली गेली होती. सकाळी तिला पुन्हा कक्षात हलविण्यात आले.
- डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक