जळगावात मू.जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारानजीक कारचा थरार, वाहनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:00 PM2018-08-02T14:00:02+5:302018-08-02T18:12:24+5:30
प्रचंड गोंधळ
जळगाव : मित्राची कार घेऊन मू.जे.महाविद्यालयात आलेल्या भावेश अरविंद सोनवणे (वय १८, रा.विवेकानंद नगर, जळगाव) या विद्यार्थ्याने सुसाट कार नेत सुरक्षा रक्षकाला जोरदार धक्का देऊन एकामागून एक अशा तब्बल ११ दुचाकींना उडविल्याची थरारक घटना गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता घडली. या घटनेत सुरक्षा रक्षक महेश रामचंद्र सोनवणे हे जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे महाविद्यालय आवारात प्रचंड गोंधळ उडाला. विद्यार्थी व विद्यार्थीनी पळत सुटले. एका विद्यार्थिनीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडल्याचे भावेश याचे म्हणणे आहे. तर ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर जोरात पाय ठेवला गेल्याने हा प्रकार घडला असावा, असाही अंदाज प्रत्यक्षदर्र्शींनी व्यक्त केला आहे.
भावेश याने रस्त्याच्या बाजुला पार्कींग केलेल्या एकामागून एक अशा ११ दुचाकींना उडविले. यात या दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले. हा प्रकार पाहिल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी घाबरुन पळत सुटले. पुढे काही अंतरावर कार थांबताच संतप्त विद्यार्थ्यांनी भावेश याला कारच्या बाहेर काढून झाडाच्या फांद्या तोडून काडीने झोडपून काढले. तर काही जणांनी कारवर हल्ला चढवून काचा फोडल्या. या घटनेमुळे क्षणात शेकडो विद्यार्थी जमा झाले होते. प्राध्यापक व प्राचार्यांनी भावेश याला विद्यार्थ्यांच्या तावडीतून सोडविले. रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन भावेश याला कारसह ताब्यात घेतले.