भुसावळ खून प्रकरणी काही तासातच खुनातील तिन्ही संशयित आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:16 PM2021-04-14T17:16:51+5:302021-04-14T17:17:39+5:30
भुसावळ खून प्रकरणी काही तासातच खुनातील तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
भुसावळ : शहरातील लिंम्पस क्लब परिसरात १३ रोजी सकाळी सातला ३४ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्याची धक्कादायक घटनेची माहिती समोर आल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मयत संदीप गायकवाड यांची पार्श्वभूमी पडताळणी केल्यानंतर व सर्व बाजूंनी बारकाईने तपासणी केल्यानंतर प्रथम दर्शनी हा खून शुल्लक कारणावरून शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी शहर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या घटनेत आरोपींनी संदीप एकनाथ गायकवाड (वय ३४,, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या इसमाचा खून केल्याचे उघड झाले होते. पत्रकार परिषदेला शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहायक निरीक्षक संदीप दुणगहू उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अर्चित चांडक, शहरचे सहायक निरीक्षक संदीप दुणगहू, शहर व बाजारपेठचे हवालदार राजेश बोदडे, हवालदार संजय सोनवणे, हवालदार मो.वली सैय्यद, सोपान पाटील, जुबेर शेख, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख यांनी हा खुनाचा गुन्हा समोर आणला.
तिन्ही आरोपींचे वय वर्ष १९
संदीप एकनाथ गायकवाड या इसमाच्या खून प्रकरणी भुसावळच्या तिन्ही आरोपींचे वय अवघे १९ वर्षे इतके आहे. अजय अशोक पाठक (१९), ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर, भुसावळ, पंकज संजय तायडे (१९), राहुल नगर, भुसावळ आणि आशिष श्रीराम जाधव (१९), श्रीराम नगर, भुसावळ या संशयितांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे मयत व अटकेतील आरोपींची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. केवळ किरकोळ वादातून त्यांनी हा खून केल्याची बाब पुढे आली आहे, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलांची गुन्हेगारीकडे वाटचाल हे चिंतेची बाब
शहरात एकेकाळी नामचिन रथी-महारथी असे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले डॉन असायचे. मात्र सद्य:स्थितीत अवघ्या अठरा, एकोणीस, वीस, पंचवीस वर्षे वयातील तरुण गुन्हेगारीकडे ओढले जात आहे हे शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब आहे. यापूर्वीसुद्धा शहरातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात गेल्या काही वर्षांमध्ये खून, घरफोडी, तलवारी काढणे, गावठी कट्टा बाळगणे, धूम स्टाईल चैन पळवणे या घटनांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अर्थातच पोलीस प्रशासन घटनेच्या काही तासातच आरोपींना ताब्यात घेतात ही जमेची बाब दिसून येते. तसेच मध्यंतरी शहरात सफेद कपडे घालून समाजात वावरणारे मोठे भंगार चोर यांच्या गोडाऊनवरसुद्धा पोलीस प्रशासनाने छापे मारले होते. यानंतर या गोडाऊनमध्ये सापडलेल्या भंगाराची नोंद ठेवण्याचे निर्देश भंगार गोडाऊनधारकांना करण्यात आले होते. मात्र अद्याप किती गोडाऊनमधून किती भंगाराचा माल आला याची माहिती समोर आलेले नाही.