'रोव्हर'च्या नजरेत साडे तीन हजार हेक्टर शेतजमीन! ७६५ गावांमध्ये मोजणीचे काम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:09 PM2023-03-30T15:09:55+5:302023-03-30T15:10:40+5:30
फेब्रुवारी अखेर जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.
- कुंदन पाटील
जळगाव : ‘रोव्हर’च्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ हजार ६६८ हेक्टर शेतजमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ७६५ गावांमध्ये ‘रोव्हर’द्वारे मोजणी सुरु असून जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील शेतजमिनीच्या मोजणीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्यावतीने १२ रोव्हर यंत्र उपलब्ध करण्यात आले होते. त्यानंतर तालुकानिहाय शेतजमिनीची मोजणी सुरु झाली होती.
फेब्रुवारी अखेर जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, मुक्ताईनगरच्या अवघ्या ९ प्रकरणांमध्ये ५६३ हेक्टर क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात भूमिअभिलेख आयुक्तांकडून जिल्ह्यासाठी १५ रोव्हर यंत्र उपलब्ध झाले आहेत.
या यंत्राविषयी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यात जिल्ह्याचा साठा समाविष्ट करण्यासह काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये २७ रोव्हर यंत्रांद्वारे मोजणी सुरु होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही यंत्रणा पोहोचणार आहे.
तालुकानिहाय मोजणी झालेली गावे, प्रकरणे आणि क्षेत्र
तालुका गावे प्रकरणे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जळगाव ९५ १३५ २०६.२९
पाचोरा ७० ७४ ३७६.९४
चाळीसगाव ९९ ९९ ४१७.९०
एरंडोल ४० ४२ १३५.००
धरणगाव ११३ १२१ ४१६.५०
अमळनेर ५७ ८७ २७६.५३
चोपडा ८५ ८५ १६४.८९
यावल १९ २१ १५९.००
जामनेर ८४ २०८ ६५२.२०
मुक्ताईनगर ९ ९ ५६३.९१
रावेर ९४ ९४ २९८.९५
एकूण ७६५ ९७५ ३६६८.११