पिंप्राळ्यातील तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:08+5:302021-05-12T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करणाऱ्या शुभम साहेबराव शिवदे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करणाऱ्या शुभम साहेबराव शिवदे (२४), निखिल साहेबराव शिवदे (२२) व सागर बाळू शिवदे (१८) या तिघांना रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सनी साहेबराव शिवदे (रा. मरीमाता चौक पिंप्राळा) हा फरार आहे. दरम्यान, तिघांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत सविस्तर असे की, भोला अरुण भोई (रा. केदार नगर, मरीमाता चौक, पिंप्राळा) हा तरुण ९ मे रोजी सकाळी ११ वाजता मरीमाता चौकात बसलेला होता. त्यावेळी गल्लीतील शुभम साहेबराव शिवदे (२४), निखिल साहेबराव शिवदे (२२), सागर बाळू शिवदे (१८) आणि सनी साहेबराव शिवदे रा. मरीमाता चौक पिंप्राळा या चौघांनी भोला याला काहीही कारण नसताना मारहाण केली. त्यावेळी त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, भोला भाई रडत असल्याचे पाहून पवन अरुण भोई याने चौघांना जाब विचारला असता यातील शुभम शिवदे व निखिल शिवदे याने मागून येऊन पवनच्या पाठीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता.
दरम्यान, गुन्ह्यातील तिघे संशयित शहरात आल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे रूपेश ठाकरे व रमेश अहिरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी या दोन अंमलदारांसोबत सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, भूषण पाटील व शिवाजी धुमाळ यांचे पथक रवाना केले. तिघांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आहे. तर चौथा साथीदार सनी साहेबराव शिवदे हा अद्याप फरार आहे. जिल्हा न्यायालयात तिघांना हजर केले असता न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.