जळगावात माथेफिरुने पेट्रोल टाकून जाळल्या तीन दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:58 PM2018-09-08T12:58:13+5:302018-09-08T12:58:58+5:30
नवीन जोशी कॉलनीतील धक्कादायक घटना
जळगाव : मुंबई, पुणे, नाशिक येथील दुचाकी जाळण्याचे लोण आता जळगाव शहरात देखील पोहोचले आहे़ गुरूवारी रात्री १़४५ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन जोशी कॉलनीत माथेफिरूने पेट्रोल टाकून तीन दुचाकी जाळल्याची थरारक घटना घडल्याने खळबळ उडाली.
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
कॉलनीत रात्रभर रहिवाशांची प्रचंड धावपळ
नवीन जोशी कॉलनीतील सुमनबाई जोशी यांना रात्री अचानक घराबाहेर जोरदार आवाज आला़ काय घडले हे पाहण्यासाठी त्या घराबाहेर आल्या़ घरासमोर असलेली कविता अशोक वैद्य यांची दुचाकी (क्र. एमएच़१९़बीडी़२८६७) ही जळत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली़ कॉलनीतील दीपक छाडीकर, नंदू जोशी, शरद जोशी, दिलीप शिंपी, सतीश छाडीकर, सतीश वैद्य यांच्यासह कविता वैद्य व नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली़ दुचाकी जळत असल्याने पाहून बादलीने त्यावर पाण्याचा मारा करत आग विझविण्यात आली.
पोलिसांकडून पाहणी
शुक्रवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस कर्मचारी दिनकर खैरनार अशोक पाटील, अनिल जाधव यांच्या पथकाने परिसरात पाहणी केली. नागरिकांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली़ यानंतर पोलीस ठाण्यात या घटनेबाबात नोंद करण्यात आली़
अन् पुढच्या गल्लीत दुचाकी जळताना दिसल्या
कविता वैद्य यांची दुचाकी आगीत संपूर्ण जळून खाक झाली़ दरम्यान आग विझवित असताना रहिवाश्यांना समोरच्या गल्लीत आगीचे लोळ व धुरासह मोठा प्रकाश दिसला़ रहिवाश्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता गिरीश रामदास जाधव यांच्या दोन दुचाकी (क्र. एम.एच़१९, बी.आऱ५४२२ व एम.एच़१९़सी.ई़९५२६) जळताना दिसून आल्या़ त्याही नागरिकांनी विझवल्या. या घटनेमुळे नवीन जोशी कॉलनीत रात्री एकच धावपळ झाली होती़
दुसऱ्याच्या वाहनातून पेट्रोल काढून दुचाकी जाळल्या
माथेफिरूने नवीन जोशी कॉलनीतील गजानन सुरेश जोशी यांच्या दुचाकीतून (क्रमांक़ एमएच़१९़७६८४) पेट्रोल काढले़ त्यानंतर कविता वैद्य व गिरीश जाधव यांच्या दुचाकींच्या सीटवर पेट्रोल टाकून दुचाकी जाळल्या़ दरम्यान, दुचाकीमध्ये पेट्रोल नसल्याचे जोशी यांना कळताच दुचाकी जाळण्यासाठी आपल्या दुचाकीतील पेट्रोलचा वापर केल्याचे त्यांच्या लक्षात आले़
आठ दिवसांपूर्वी मोबाईलची चोरी
गिरीश जाधव यांची नाशिक येथे बदली झाली आहे़ त्यामुळे नवीन जोशी कॉलनीतील घरात त्यांचे आई-वडीलच राहतात़ ही संधी साधत चोरट्यांनी देखील आठ दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरातून मोबाईल चोरून नेल्याची माहिती कॉलनीतील रहिवाश्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ तोच गेल्या दोन ते तीन महिन्यात रिक्षाचे टायरची चोरी, पेट्रोल चोरी, तसेच दहा महिन्यांपूर्वी मनुबाई चंद्रकांत साळवे या महिलेच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारीत दागिने चोरून नेले होते़ त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे़