जळगाव शहरात एकाच दिवशी तीन घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:14+5:302020-12-23T04:13:14+5:30
जळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून विश्रांती घेतलेले चोरटे शहरात पुन्हा सक्रीय झाले असून एकाच रात्री खोटे नगर, गणेश कॉलनी ...
जळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून विश्रांती घेतलेले चोरटे शहरात पुन्हा सक्रीय झाले असून एकाच रात्री खोटे नगर, गणेश कॉलनी व गणपती नगरात घरफोडी करुन चोरट्यांनी १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. याप्रकरणी मंगळवारी जळगात तालुका, जिल्हा पेठ व रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
एका कंपनीत एरीया मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले नितीन कुमार महाले (वय ३७रा. एरंडोल) हे हौसिंग सोसायटी खोटे नगर येथे एकटे राहतात. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ते घराला कुलुप लावून कामावर निघून गेले. त्यानंतर ते एरंडोल ते जळगाव असे अपडाऊन करत होते. दरम्यान, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घरमालकांनी घरफोडी झाल्याने महाले यांना कळविले. त्यानुसार महाले यांनी घरात येवून पाहणी केली असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटमधील ठेवलेले १० हजार रूपयांची रोकड आणि लहान मुलांचा मनी बँकची चोरी केल्याचे निष्पन्न आले.
गणपती नगरात भरदिवसा घरफोडी
गणपती नगरातील वैभव स्टेट कॉलनीत कांतीलाल पृथ्वीराज वर्मा (वय ७१)यांचे बंद घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघड झाला. कांतीलाल वर्मा हे वयोवृध्द असल्याने घरात एकटेच राहतात. मुलगा शहरातच दुसरीकडे वास्तव्याला आहे. २१ डिसेंबर रोजी घराला कुलुप लावून दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेवणाचा डबा घेण्यासाठी मुलाकडे गेले. १.२५ वाजेच्या सुमारास ते डबा घेवून परत असले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे वस्तू आणि रोकड असा एकुण ५० हजार रूपयांची मुद्देमाल गायब होता.
चार महिन्यापासून बंद असलेले घर फोडले
गणेश कॉलनी येथे संगीता कमलाकर जोशी यांचे चार महिन्यांपासून बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी एलईडी टीव्ही, लॅपटॉप असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल लांबविला. जोशी या गणेश कॉलनी येथे प्लॉट नं ७१/१ येथे मुलगी भारती जोशी हिच्यासह राहतात. पतीचे निधन झाले आहे. दुमजली घर असून वरच्या मजल्यावर जोशी तर खालच्या मजल्यावर त्यांचे सासरे राहतात. २७ जुलै २०२० रोजी संगीता जोशी या मुलीसह मोठ्या मुलीच्या प्रसूतीसाठी नाशिक येथे गेल्या होत्या. यादरम्यान लॉकडाऊन असल्याने जोशी या नाशिक येथेच मुक्कामी थांबल्या. चार महिन्यानंतर २१ डिसेंबर रोजी संगीता जोशी यांची मुलगी भारती जोशी ही आजोबा विलास कुळकर्णी यांच्यासोबत जळगावला परतली. यावेळी भारती हिस घराच्या गेटचे कुलूप तुटलेले घरातील लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. यानंतर भारती हिने तिच्या आईस फोनवरुन घटना कळविली. चोरट्यांनी घरातील २५ हजार रुपयांचा ३२ इंची एलईडी टीव्ही, २५ हजारांचे लॅपटॉप तसेच पंजाब नॅशनल बँक व युनीयन बँकेचे सर्टिफिकेट लांबविले.