तीन केंद्रांना मिळणार प्रत्येकी २५ वाढीव थाळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:33+5:302020-12-15T04:32:33+5:30
जळगाव : शहरातील तीन शिवभोजन केंद्रांना प्रत्येकी २५ थाळ्या वाढवून देण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असून, ...
जळगाव : शहरातील तीन शिवभोजन केंद्रांना प्रत्येकी २५ थाळ्या वाढवून देण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असून, त्या प्रस्तावांमधील तीन केंद्रांची निवड ही शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत शिवभोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली. या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मनोहर रेस्टॉरंटची या शिवभोजन केंद्राची तपासणी केली असता, अनियमितता आढळून आली होती. त्यामुळे या केंद्रावरील १५० थाळ्यांपैकी ७५ थाळ्या कमी करण्यात आल्या होत्या. कमी केलेल्या ७५ थाळ्या या इतर केंद्रांना वाढवून देण्यासाठी सोमवारी बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती शहरातील तीन केंद्रांना प्रत्येकी २५ असे एकूण ७५ थाळ्या वाढवून देण्याचे ठरले. त्यानुसार शहरातील १६ केंद्रांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे़ शासनाकडून १६ शिवभोजन केंद्रांमधील तीन केंद्रांची निवड करण्यात येईल. त्याच केंद्रांना प्रत्येकी २५ थाळ्या वाढवून दिल्या जाणार आहेत.
केंद्रांची तपासणी होईना...
शहरात १६ तर ग्रामीण भागात २२ शिवभोजन केंद्र आहे़ या केंद्रांची नियमित अधिकाऱ्यांकडून तपासणी होणे अपेक्षित आहे. महसूल आढावा बैठकीत तहसीलदारांना तपासणी करण्याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत; मात्र तपासणी होताना दिसून येत नाही, अशीही चर्चा बैठकीत झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.