व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्ण दगावले, ट्रॉमा केअर सेंटरमधील घटना; व्हेंटिलेटर धूळ खात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:12 AM2021-03-19T07:12:01+5:302021-03-19T07:13:28+5:30
या आजारांमध्ये कुठल्याही प्रकारची लपवालपवी न करता सुरुवातीलाच निदान केल्यास जास्त त्रास होत नाही. बाधित रुग्णांनी त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावे. वेळेवर उपचार करावा, अशी अपेक्षा ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर चौधरी यांनी व्यक्त केली.
भुसावळ (जळगाव): राज्यात कोरोनाची दुसरी लाट म्हणावी अशी भीषण परिस्थिती असताना भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील साकेगाव हद्दीत असलेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांत दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून एक रुग्ण बुधवारी (१७ मार्च) रात्री तर अन्य दोघे गुरुवारी पहाटे दगावले. सात महिन्यांपूर्वीच रुग्णालयाला १० व्हेेंटिलेटर प्राप्त होऊनही ते धूळ खात पडून असल्याने रुग्णांना प्राणास मुकावे लागले.
बुधवारी रात्री बोदवड तालुक्यातील ६० वर्षीय पुरुषास गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या रुग्णास विविध रुग्णालयांत नेऊनसुद्धा व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला आणण्यात आले. मात्र, तेथेही व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १८ रोजी सकाळी कासोदा (ता. एरंडोल) येथील ६० वर्षीय पुरुष, न्हावी (ता. यावल) येथील ६० वर्षीय महिला यांनाही व्हेंटिलेटरची नितांत आवश्यकता असताना वेळेवर उपलब्ध झाला नाही, तांत्रिक अडचणी याशिवाय अत्यंत कमी झालेली ऑक्सिजन पातळी व उपचाराला झालेला उशीर यामुळे मृत्यू ओढवला.
डाॅक्टर म्हणतात...
या आजारांमध्ये कुठल्याही प्रकारची लपवालपवी न करता सुरुवातीलाच निदान केल्यास जास्त त्रास होत नाही. बाधित रुग्णांनी त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावे. वेळेवर उपचार करावा, अशी अपेक्षा ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर चौधरी यांनी व्यक्त केली.
क्षमतेपेक्षा अधिक कोरोना रुग्ण
या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी अवघे ४० बेड उपलब्ध आहेत. मात्र, यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्णांना या ठिकाणी भरती केले आहे. या रुग्णालयात पीएम केअर निधीतून सात महिन्यांपूर्वी १० व्हेेंटिलेटर देण्यात आले होते. या ठिकाणी पुरेसे डाॅक्टर व कर्मचारी नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहेत.