प्रभागातील विकासकामांच्या आश्वासनानंतर तिघे नगरसेवक शिवबंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:23+5:302021-05-30T04:14:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत मार्च महिन्यात ऐतिहासिक सत्तांतर घडविल्यानंतर शिवसेनेने पुन्हा दोन महिन्याचा अंतरातच भाजपला दुसरा धक्का ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत मार्च महिन्यात ऐतिहासिक सत्तांतर घडविल्यानंतर शिवसेनेने पुन्हा दोन महिन्याचा अंतरातच भाजपला दुसरा धक्का दिला आहे. भाजपच्या पिंप्राळा मधील सुरेश सोनवणे, शोभा बारी, शबीनाबी शेख शरीफ या तिन्ही नगरसेवकांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे.
शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीपासून सुरू केलेले ऑपरेशन शिवधनुष्य अंतर्गत भाजपचे नगरसेवक आपल्याकडे खेचण्याचा करेक्ट कार्यक्रम महापालिकेत अजूनही सुरू आहे. मार्च महिन्यात भाजपचे २७ नगरसेवक फोडल्यानंतर आता पुन्हा ३ नगरसेवक फोडून महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ४५ पर्यंत पोहोचले आहे. तर भाजपचे संख्याबळ ५७ वरून आता ३० वर आले आहे. शनिवारी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासोबत या तिन्ही नगरसेवकांनी मुंबईला मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत व विलास पारकर हे देखील उपस्थित होते.
प्रभागातील विकासकामांचे दिले आश्वासन
महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर भाजपच्या शिल्लक असलेल्या ३० नगरसेवकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खदखद निर्माण झाली होती. त्यात प्रभागातील कामेदेखील थांबल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी वाढत असल्याने शिवसेनेने आयती संधी साधत भाजपचे पुन्हा तीन नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत. दरम्यान, या तीनही नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या नेतृत्वाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजून आठ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा
मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपचे अजून आठ नगरसेवक संपर्कात असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी या नगरसेवकांचाही शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचा दावा कुलभूषण पाटील यांनी केला आहे.
कोट..
आमचा प्रभागातील अनेक कामे अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. त्यात महापालिकेतील सत्ता गमावल्यामुळे इतर उर्वरित कामे देखील भविष्यात होतील की नाही याबाबत शंका होती. शिवसेनेच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून, आमच्या प्रभागातील विकासकामे होतील याच अपेक्षेने आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
-सुरेश सोनवणे, नगरसेवक
भाजपच्या तीन नगरसेवकांबाबत मला माहित नाही. ज्याला जायचे आहे, त्यांनी जावे. संधीसाधू लोक असे करतात. सत्ता आली की तिकडे जातात.
- गिरीश महाजन, भाजप नेते.