दोनच दिवसात तीन कोटी रुपयांची तिकिटे केली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:38 PM2020-04-16T20:38:49+5:302020-04-16T20:38:57+5:30
भुसावळ रेल्वे विभाग : लॉकडाऊन वाढविल्याने हिरमोड
भुसावळ : कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होऊन १४ एप्रिल नंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू होईल या आशेने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची आॅनलाइन तिकीट बुकिंग केली होती. मात्र लोकडाऊन ३ मे पर्यंत वाढल्याने १४ व १५ एप्रिल या दोनच दिवसात ४३ हजार ६२९ प्रवाशांनी तब्बल २ कोटी ८६ लाख ३० हजार ६७५ रुपयाची आॅनलाईन तिकीटे रद्द केली आहेत.
२२ मार्चला 'जनता कर्फ्यू' व २३ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाउन घोषित केल्याने जिल्ह्यासह राज्यभरात नोकरवर्ग व मजूरवर्ग अडकून पडला. अशा हजारो लोकांनी आपल्या गावाला १४ एप्रिल नंतर जाण्याच्या आशेपोटी तिकीटांची आॅनलाईन बुकिंग केली.
मात्र १४ रोजी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचे घोषित केल्याने अडकलेल्याने या सर्वांचा हिरमोड झाला.
दरम्यान आता पुन्हा तर लॉकडाऊन वाढणार नाही ना ? अशी भिती अनेकांना असून केव्हा आपल्या घरी जाता येईल? याची प्रतीक्षा लागून आहे.