चाळीसगाव तालुक्यात तीन दिवसात गिरणा धरणातून पाण्याचे आर्वतन - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:04 PM2018-11-02T13:04:44+5:302018-11-02T13:05:14+5:30
तालुक्यातील खरजाई व तरवाडे या गावाना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी
चाळीसगाव, जि. जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी चाळीसगाव तालुक्यातील खरजाई व तरवाडे या गावाना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी येत्या तीन दिवसात गिरणा धरणातून पाण्याचे आर्वतन सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.
बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने ३३०० कोटी रूपयांची भरपाई दिली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी या वेळी दिली. खरजाई, तरवाडे, ओझर या गावाची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी गावाना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र विहीरीचे नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भडगाव तालुक्यातील तांदलवाडी येथे भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रंशात सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात ४ हजार क्विंटल हरभरा बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हडसन ता. पाचोरा येथील शेतकºयांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. सामनेर ता. पाचोरा येथे शेतकºयांशी संवाद साधला. त्यानंतर वडली ता. जळगाव येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या योजनांच्या ठिकाणी भारनियमन नको, अशी मागणी वडली ग्रमस्थांची पालकमंत्र्यांकडे केली.