धरणगाव येथे साखरझोपेत असलेल्या मायलेकांसह तिघांना ट्रकने चिरडले, मातेचा मृत्यू, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:12 PM2018-04-27T12:12:45+5:302018-04-27T12:12:45+5:30
पहाटेच काळाचा घाला
आॅनलाइन लोकमत
धरणगाव, जि. जळगाव, दि. २७ - धरणगाव शहरातील चोपडा रोडवर रस्त्यालगत असलेल्या घरात जळगावहून चोपड्याकडे जाणारा भरधाव ट्रक घुसून घराबाहेर झोपलेल्या दोन महिला व १४ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील रेखाबाई संजय भिल (वय-३५) ही महिला जागीच ठार झाली तर आनंद संजय भिल (वय-१४), जयत्राबाई भिल(वय-६५) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
चोपडा रोड लगत असलेल्या घराबाहेर रेखाबाई भिल, तिचा १४ वर्षीय मुलगा आनंद व जयत्राबाई हे खाटेवर झोपलेले होते. साखर झोपेत असताना जळगावहून चोपड्याकडे जाणारा भरधाव ट्रकने (क्र.एम.एच.१८, ०५७३) तिघं जणांना चिरडून ट्रक घरात घुसला. या घटनेची वार्ता कळताच नागरिकांनी धाव घेतली व मदत कार्य केले. यावेळी गुलाबराव वाघ, भानुदास विसावे, धिरेंद्र पुरभे,गुलाब मराठे आदींनी सहकार्य केले.
गतिरोधक न बसविल्यास आंदोलन
चोपडा रोडवर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या एका बाजूला पारधी वाडा तर दूसऱ्या बाजूला भिलवाडा व तीन वार्डाच्या महिलांसाठी सार्वजनिक शौचालय असल्याने वर्दळ असते. मात्र या परिसरात गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे या परिसरात गतिरोधकाची आवश्यकत असल्याने सा.बां.विभागाने गतिरोधक बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ईशारा नगरसेविका संगिता गुलाब मराठे यांनी दिला आहे.