महसूलच्या पथकाने पकडले वाळूचे तीन डंपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:08 PM2019-04-06T14:08:51+5:302019-04-06T14:09:22+5:30
प्रत्येकी अडीच लाखाचा दंड : शिरसोली येथेही पकडला ट्रक
जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर शुक्रवारी महसूलच्या पथकाने पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. त्यांचा पंचनामा करण्यात आला असून प्रत्येकी अडीच लाख रुपयांची दंडाची नोटीस बजावण्यात आली.
सध्या वाळू वाहतूक बंद असताना शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक होते की काय याची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी तहसीलदार वैशाली हिंगे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी वंजारी व पोलीस कर्मचारी असोदा रेल्वे फाटकनजीक पोहचले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास असोदा रेल्वे फाटक ते लेंडी नाल्यादरम्यान वाळूची वाहतूक करताना तीन डंपर आढळून आले. त्या वेळी या पथकाने या डंपरला अडवून पाहणी केली असता त्यात वाळू भरलेली आढळून आली. ही तीनही डंपर (क्र. एम.एच. १९ सीवाय - १११४, एम.एच. १९ सीवाय - १११३ व एम.एच. ०६ ३७६३) पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात आणून जमा केली. त्यांचा पंचनामा करण्यात आला असून या डंपरला प्रत्येकी अडीच लाख रुपयांची नोटीस बजावण्यात येणार आहे.
शिरसोलीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा थरार
शिरसोली प्र.बो.- बाजार पेठेतून भरधाव वेगाने जाणारे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर तलाठ्यांच्या पथकाने पकडले. वर्दळीच्या ठिकाणाहून भरधाव वेगाने हे डंपर गेल्याने सर्वांचा थरकाप उडाला. या वेळी मोठी दुर्घटना टळली. डंपर चालक डंपर सोडून पळून गेला. पथकाने डंपर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले आहे. शिरसोली येथे संध्याकाळी सहा वाजेदरम्यान बाजारपेठेत मोठी गर्दी असताना गिरणा नदी पात्रातून वाळू भरुन आलेले डंपर बाजार पेठेतून भरधाव वेगाने गेले. त्या वेळी अनेकांनी जीव मुठीत घेवून बाजूला पळाले. त्या वेली संध्याकाली म्हसावद मंडल अधिकारी जे.एस. गुरव, तलाठी एस.आर. नेरकर, राहुल अहिरे, मनोज सोनवणे व भारत नन्नवरे यांच्या पथकाने हे डंपर शिरसोली गावात पकडले. या वेळी डंपर चालकाने डंपर सोडून पळ काडला.