पोहण्यासाठी गेलेले तिघे मित्र पाण्यात बुडाले, दोघ वाचले तर एक बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 10:19 PM2019-11-01T22:19:54+5:302019-11-01T22:21:28+5:30
तिघे मित्र नदीत पोहण्यासाठी जात असताना एक जण पाय घसरून पाण्यात पडला तर त्याला वाचवताना दोघेही पाण्यात बुडाले. मात्र तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले तर एक जण अजून बेपत्ता आहे.
सचिन पाटील
नेरी, ता.जामनेर, जि.जळगाव : तिघे मित्र नदीत पोहण्यासाठी जात असताना एक जण पाय घसरून पाण्यात पडला तर त्याला वाचवताना दोघेही पाण्यात बुडाले. मात्र तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले तर एक जण अजून बेपत्ता आहे. या ह्रदयद्रावक घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण पसरले असून, तरुणाचा जीव वाचावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.
अतुल संजय पवार (वय १७), सागर नाना इधाटे (वय २०) व चेतन नारायण इधाटे (वय १७) (सर्व रा.सुनसगाव, ता.जामनेर) हे तिघे मित्र शुक्रवारी दुपारी दोनला येथील वाघूर नदीत पोहण्यासाठी जात होते. या नदीवरील बांधावरुन जात असताना एकाचा पाय घसरून पाण्यात पडला. त्याला काढण्यासाठी दोघ जण प्रयत्न करीत असताना तोल जावून तेदेखील पाण्यात पडले. मात्र सुर्दैवाने जवळ असलेल्या एका इसमाने त्यांना बुडताना बघितल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात सागर व चेतन या दोघांना वाचवण्यात यश आले. मात्र अतुल हा पाण्यात खोलवर बुडाल्याने त्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता.
ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू झाले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अतुल न सापडल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचा जीव वाचवा म्हणून प्रार्थना केली जात आहे.
वडिलांनी केले शर्थीचे प्रयत्न, तेही पाण्यात बुडू लागताच त्यांना काढले बाहेर
या घटनेची माहिती मिळताच अतुलचे वडील संजय भगवान पवार (४०) घटनास्थळी धावत आले व सरळ त्यांनी पाण्यात उड़ी घेऊन आपल्या मुलाची शोधाशोध केली. पण भरपूर वेळ होऊन मुलगा सापडत नसल्याने वडिलांनीदेखील पाण्यातच धीर सोडला. त्यामुळे ते देखील पाण्यात बुडू लागले. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर खासगी दवाखाण्यात उपचार करण्यात आले.