जळगावात निवृत्त डॉक्टरकडे तीन लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:08 PM2018-07-27T13:08:59+5:302018-07-27T13:09:20+5:30
पुणे येथे गेले होते शस्त्रक्रियेसाठी
जळगाव : पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी मधुकर माधवराव निराळे (वय ८२) या सेवा निवृत्त वैद्यकिय अधिकाऱ्याचे बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ८० हजार रुपये रोख व एक लाख २० हजाराचे दागिने असा तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी महाबळमधील शारदा कॉलनीत उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयातून वैद्यकिय अधिकारी पदावरुन निवृत्त झालेले मधुकर निराळे हे पत्नी रजनी यांच्यासह शारदा कॉलनीतील शारदा गृहनिर्माण सोसायटीत वास्तव्याला आहेत. मुलगा सुहास व सुधीर दोन्ही जण कॅनडा येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहेत तर मुलगी माधुरी चिंचोले या गुलबर्गा (आंध्रप्रदेश) येथे वास्तव्याला आहे. त्यामुळे घरी दोघंच पती-पत्नी असतात. मधुकर निराळे यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया असल्याने पत्नीसह ते ३० जून रोजी पुणे येथे गेले होते. १८ जुलै रोजी भाचा मंदार पराग पाडसकर यांनी फोन करुन घराच्या दरवाजाचे कुलुप तुटलेले असून चोरी झाल्याची माहिती कळविली होती. शस्त्रकिया व वैद्यकिय उपचार झाल्यानंतर निराळे हे गुरुवारी जळगावात आले. घरी आल्यानंतर जिन्याजवळील दरवाजाची कडी व मुख्य दरवाचे कुलुप तुटलेले दिसले. कपाटीतील ऐवज लांबविण्यात आल्याचे लक्षात आले.
८० हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीचा १० ग्रॅम सोन्याचा शिक्का, ३० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅमच्या सोन्याच्या ४ अंगठ्या,५ हजार रुपये किमतीचे कानातील जोड, २२ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅमची सोनसाखळी, ३ हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, ४५ हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा २ लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.