तीन गटांमध्ये आघाडीत बिघाडी
By admin | Published: January 31, 2017 12:10 AM2017-01-31T00:10:44+5:302017-01-31T00:10:44+5:30
अमळनेर व चोपडय़ाचा तिढा कायम : राष्ट्रवादीकडून तालुकास्तरावर एबी फॉर्म वाटप
जळगाव : जिल्हा परिषदेत गेली 15 वर्ष सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला. मात्र पाचोरा, जळगाव ग्रामीण व चाळीसगाव तालुक्यातील तीन गटात वाटाघाटी न झाल्याने या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. तर अमळनेर व चोपडा तालुक्यातील जागा वाटपाचा तिढा संपलेला नसल्याने सोमवारी रात्री उशिरार्पयत चर्चा सुरुच होती.
अमळनेर व चोपडय़ाचा तिढा कायम
अमळनेर व चोपडा तालुक्यातील जागावाटपात यशस्वी तोडगा निघालेला नाही. चर्चेचे गु:हाळ सोमवारी रात्री उशिरार्पयत सुरु होते. राष्ट्रवादी व काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेपासून मागे हटण्यास तयार नसल्याने मंगळवारी पुन्हा या दोन तालुक्यातील जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे.
मात्र या तालुक्यात देखील आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
तीन गटांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी समोरासमोर
काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीसाठी आघाडी केल्यानंतर सुरुवातीच्या दोन तीन बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. काँग्रेसने जळगाव तालुक्यातील शिरसोली-चिंचोली गटासाठी आग्रह धरला. मात्र हा गट राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी तो काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. तर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर- शिंदाड गटासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय पाटील हे इच्छुक असल्याने काँग्रेसने या गटाची मागणी केली. राष्ट्रवादी देखील या गटासाठी आग्रही आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड-रांजणगाव या गटासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहे. या तिन्ही ठिकाणी सोमवार्पयत यशस्वी तोडगा न निघाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकाविरूद्ध लढणार आहेत.
राष्ट्रवादीचे एबी फॉर्म रवाना
राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ज्या जागांवर एकमत झाले आहे त्या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांच्या नावाचे एबी फॉर्म तालुकाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे. मंगळवारी त्या-त्या उमेदवारांच्या नावाने हे एबी फॉर्म देण्यात आले आहेत. काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविली असून निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.
पाचोरा तालुक्यातील शिंदाड गट, जळगाव तालुक्यातील शिरसोली-चिंचोली या दोन गटात एकमत न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. तालुकास्तरावर आम्ही उमेदवारांचे एबी फॉर्म पाठविले आहेत.
-डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.
तीन गटांमधील जागावाटपात एकमत न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र उर्वरित गट व गणांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिल.
-अॅड.संदीप पाटील,जिल्हाध्यक्ष,काँग्रेस