शॉर्टसर्किटमुळे आग लागून करंज येथे तीन घरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:15 AM2021-03-18T04:15:27+5:302021-03-18T04:15:27+5:30
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंज गावातील रहिवासी सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घरातून सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास ...
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंज गावातील रहिवासी सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घरातून सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास आगीचे लोळ निघताना गावकऱ्यांच्या लक्षात आले. घराला कुलूप लावलेले होते. शेजारी राहणारे दीपक पाटील आणि मधुकर पाटील यांच्या घरातूनही धूर निघत होता. गावकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करून जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटना कळविण्यात आली. अग्निशमन बंब येईपर्यंत तीनही घरांतील संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. यात सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या घरातील सदस्यांची महत्त्वाची कागदपत्रेही जळाली आहेत. त्यांचे एकूण ४ लाख रुपयांचे नुकसान झाले, दीपक पाटील यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले, तर मधुकर पाटील यांच्या घरातील चार लाख रुपयांचे नुकसान झाले. तीनही घरातील सुमारे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी सी.एस. कोळी, उपसरपंच छाया सपकाळे, पोलीस पाटील सुनील सपकाळे यांनी घटनेचा पंचनामा केला. हिलाल पाटील, नारायण पाटील, अनिल सपकाळे, नारायण सोनवणे, भावलाल सपकाळे, पांडुरंग सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी मदत केली.