जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध दारु पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:09 PM2019-04-22T12:09:27+5:302019-04-22T12:09:59+5:30
पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक व जळगाव येथील भरारी पथकाने रविवारी चाळीसगाव, पुरनाड व अंतुर्ली फाटा येथे मध्यप्रदेशनिर्मित अवैध दारुचा साठा पकडला. पथकाने दारु बाळगणाऱ्यांविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दोन जणांना अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या दारुची किंमत १ लाख ७८ हजार ४०० रुपये इतकी आहे.
विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या नाशिक येथील भरारी पथकातील निरीक्षक मनोज चव्हाण व जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक वसंत माळी यांच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव शहरातील चेतन बियर आणि वाईन शॉपी या दुकानात छापा मारु न १ लाख १४ हजार १० रुपये किमतीची अवैध दारु पकडली. मोहन जगन्नाथ चौधरी (४०, रा.चाळीसगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
शेजारीच असलेल्या दुकानातही ३ हजार ९३० रुपयांची दारु पकडण्यात आली. अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथील नाक्यावर अरुण मुरलीधर चौधरी (रा.चापोरा, बºहाणपुर) याच्याजवळ दहा हजार रुपये किमतीच्या ९६ बाटल्या आढळून आल्या. हा सर्व दारुचा साठा मध्यप्रदेशातून आलेला आहे. निरीक्षक बी.बी.देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याशिवाय १३० लीटर गावठी दारु व ६ हजार ८४० लीटर रसायन जप्त करण्यात आले.