गोवर्धन येथील स्वयंभू काल भैरवनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:01 PM2017-11-11T17:01:37+5:302017-11-11T17:08:32+5:30
अमळनेर तालुक्यातील गोवर्धन येथील स्वयंभू कालभैरवनाथांच्या यात्रोत्सवानिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
लोकमत आॅनलाईन
मारवड ता. अमळनेर, दि.११ : कालभैरव जयंतीनिमित्त येथील माळण नदीकाठावरील गोवर्धन येथील स्वयंभू काल भैरवनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. यात महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात हजेरी होती. दिवसभरात तीन लाख भाविकांनी हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.
प्रारंभी शुक्रवारी पहाटे ५ वाजता धूप, ध्यान आरती होऊन ६ वाजता ध्वजारोहण झाले. नंतर मान्यवर जोडप्यांच्या हस्ते होमपूजन झाल्यावर सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु होता. त्याचवेळी भाविकांनी भैरवनाथांच्या दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कालभैरवनाथ हे स्वामी समर्थांचे कुलदैवत असल्याने संपूर्ण राज्यभरातील स्वामी समर्थांच्या भक्तगणांची विशेष उपस्थिती होती.