मध्यप्रदेशात प्रवेश बंदीमुळे दररोज तीन लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:39+5:302021-03-22T04:14:39+5:30
वाहतूक अधिकाऱ्यांची माहिती : सध्या रावेरपर्यंतच बससेवा उपलब्ध जळगाव : कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसेसला बंदी घालण्यात ...
वाहतूक अधिकाऱ्यांची माहिती : सध्या रावेरपर्यंतच बससेवा उपलब्ध
जळगाव : कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसेसला बंदी घालण्यात आल्यामुळे, एस. टी. महामंडळाच्या जळगाव विभागाचे दररोज तीन लाखांचे उत्पन्न बुडत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी दिली, तर सध्या बसेस बऱ्हाणपूरपर्यंत न जाता रावेर आगारापर्यंतच जात असल्याचेही बंजारा यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून, खबरदारी म्हणून मध्यप्रदेश सरकारने परराज्यातून येणाऱ्या बसेसला बंदी घातली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध आगारांतून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या बसेसची सेवा तीन दिवसांपासून बंद आहे. महामंडळाच्या जळगाव विभागातील जळगाव आगारासह, भुसावळ, चोपडा, यावल, एरंडोल व रावेर आगारातून एकूण ४८ फेऱ्या बऱ्हाणपूर येथे धावत होत्या. बऱ्हाणपूर व खंडवा या भागात मोठ्या प्रमाणावर मराठी बांधव असल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यातून महामंडळाला दररोज तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. सणासुदीला तर चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे ही सेवा बंद झाल्यामुळे महामंडळाला दररोज तीन लाखांचा फटका बसत आहे. आधीच कोरोनामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असताना, आता उत्पन्नाच्या मार्गावरील बसेस बंद झाल्यामुळे महामंडळाच्या तोट्यात अधिकच भर पडली आहे.
इन्फो :
सध्या रावेरपर्यंतच सेवा
कोरोनामुळे मध्यप्रदेशात या बसेस जात नसल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध आगारांतील बसेस या रावेरपर्यंतच जात आहेत. त्या ठिकाणाहून बऱ्हाणपूर आगाराच्या बसने प्रवासी मध्यप्रदेशात जात आहेत. मात्र, मध्यप्रदेशातील बसेस या महाराष्ट्रात बिनधास्तपणे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही या बसेसला बंदी घालण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो
...तर कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यावरच मध्य प्रदेशात प्रवेश
मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसेसला प्रवेश बंदी केल्यामुळे, जळगाव जिल्ह्यातील बसेस सध्या रावेरपर्यंतच जात आहेत. रावेरहून बऱ्हाणपूर आगाराच्या बसेसने मध्यप्रदेशात जाता येते. मात्र, मध्य प्रदेशात जाण्यासाठी महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे गरजेचे आहे. तेथील वाहकाला हा निगेटिव्ह अहवाल दाखवल्यावरच बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या प्रवाशाला बसमध्ये परवानगी देण्यात येत आहे. याबाबत बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव विभागाला पत्र पाठविले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी केले आहे.