भूमिगत टाकीतील तीन लाख लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:01 PM2020-08-11T13:01:59+5:302020-08-11T13:02:14+5:30
मनपा : पाणी साठवण टाकीत सांडले आॅईल, दुषित पाणीपुरवठ्यानंतर टाकीची केली स्वच्छता
जळगाव : मनपाच्या गिरणा टाकी परिसरातील भूमिगत पाणी साठवण टाकीत आॅईल सांडल्याने रविवारी शहरात अनेक ठिकाणी आॅईलयुक्त दुषित पाणीपुरवठा झाला. या प्रकारानंतर मनपा पाणीपुरवठा विभागाने रविवारी सकाळी आणि सोमवारीदेखील टाकीतील पाणी काढून संपूर्ण टाकीची स्वच्छता केली. आॅईल सांडल्यामुळे भूमिगत टाकीतील तीन लाख लिटर पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर फेकण्यात आले.
मनपाने गिरणा टाकी परिसरात सुमारे दोन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी उभारली आहे. या टाकीवर उच्च क्षमतेच्या इलेक्ट्रीक पंपाचा वापर करून शहरातील विविध जलकुंभामध्ये पाणी सोडण्यात येते. शनिवारी मध्यरात्री भूमिगत टाकीमध्ये पाणीपुरवठा सुरू असताना अचानक विद्युत पंपाच्या दाबामुळे पाणी वर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही कर्मचाऱ्यांनी टाकीतील पाणी वर उडाल्याने पंप हाऊसवरील आॅईलच्या बॅरेलवरील तेलकट भागावर पडून हे पाणी पुन्हा टाकीमध्ये गेले असल्याचा अंदाज वर्तविला.
तीन लाख लिटर पाणी गेले वाया... भूमिगत टाकीतील संपूर्ण पाणी आॅईलयुक्त झाल्याने, सोमवारी सकाळीदेखील पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी नळांना दुषित पाणी आले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी पंपाद्वारे सोमवारी सकाळपासूनच टाकीतील पाणी बाहेर सोडले.टाकीतून सुमारे दीड ते पावणे दोन लाख लीटर पाणी बाहेर टाकण्यात आले असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.तसेच रविवारीदेखील टाकीतील सर्व पाणी बाहेर काढून टाकी स्वच्छ करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसात आॅईलमुळे तीन लाख लीटर पिण्याचे पाणी वाया गेले आहे.
रविवारप्रमाणे सकाळीदेखील काही भागात आॅईलयुक्त दुषित पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे पुन्हा पंपाद्वारे भूमिगत टाकीतील पाणी काढून, टाकी स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर संबंधित भागात पुन्हा पाणी पुरवठा करण्यात आला.
-सुशील साळुंखे, विभाग प्रमुख, पाणी पुरवठा विभाग