अतिप्रसंग आणि लग्नाच्या बाता, तिघी जणी ठरल्या कुमारी माता महिनाभरात तीन घटना

By विजय.सैतवाल | Published: April 2, 2023 09:05 PM2023-04-02T21:05:53+5:302023-04-02T21:06:06+5:30

मामे भावाकडून अतिप्रसंग तर कोठे पलायनातून ओढावले मातृत्व

three minor became virgin mothers, Three incidents in a month | अतिप्रसंग आणि लग्नाच्या बाता, तिघी जणी ठरल्या कुमारी माता महिनाभरात तीन घटना

अतिप्रसंग आणि लग्नाच्या बाता, तिघी जणी ठरल्या कुमारी माता महिनाभरात तीन घटना

googlenewsNext

जळगाव : काही घटनांमध्ये प्रेमाचे आकर्षण तर कोठे नात्यातील व्यक्तीकडूनच होणारा अतिप्रसंग यासह वेगवेगळ्या कारणांमुळे अविवाहीत असतानाच मुलींच्या नशिबी मातृत्व आल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे महिनाभरातीलच या तीन घटना असून कोठे मामे भावाने अतिप्रसंग केल्याने तर दुसऱ्या एका घटनेत पलायन केल्याने मुलगी गर्भवती राहिली. तिसऱ्या एका घटनेत तर कारणच माहित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली व घरोघरी टीव्हीपाठोपाठ मोबाईलही आले. त्यात सध्या अनेक मालिका, चित्रपटांमध्ये बिभस्तपणा चांगलाच रंगवून दाखविला जात आहे. प्रेम कथा, त्यातून पलायन व पुढील सर्व कथानक समोर दिसल्यास या वयातील मुलं-मुली त्यास बळी पडतात. यातून मग शारीरिक आकर्षण वाढून नको तो प्रसंग ओढावतो व त्यातून कमी वयातच गर्भधारणा होते. अनेक वेळा मुलं-मुली पलायन करून जातात व त्यावेळीही अशा घटना घडतात. गर्भधारणा झाल्यानंतर ठराविक वेळेत त्याकडे लक्ष दिले गेल तर गर्भपात केला जाऊ शकतो. मात्र १६ आठवड्यांच्या पुढे गर्भ गेल्यास प्रसूतीशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळेच अविवाहीत असतानाही नशिबी मातृत्व येते.

महिनाभरातील हे बोलके प्रसंग

१) मामे भावाने लादले मातृत्व

१६ ते १७ वयोगटातील रावेर तालुक्यातील एका मुलीवर तिच्या मामाच्या मुलानेच अतिप्रसंग केला. त्यातून ती मुलगी गरोदर झाली. सध्या ही मुलगी आठ महिन्याची गर्भवती असून पोलिस जबाबात अतिप्रसंगाचा किस्सा समोर आला. सध्या या मुलीला बाल कल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले असून महिनाभरात तिची प्रसूती होणार आहे.

२) पलायन केले आणि ओढावले मातृत्व

दुसरी एक घटना जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या मुलीने एका मुलासोबत पलायन केले. तेथे त्यांच्यात शारीरिक संबंध आले व त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली व मातृत्व ओढावले.

३) १७ वर्षांच्या मुलीची प्रसूती

तिसरी घटना तर चक्रावणारी आहे. बारामती, फलटण या भागातून मोलमजुरीसाठी आलेल्या एका कुटुंबातील १७ वर्षीय मुलीची भुसावळ येथे प्रसूती झाली. मात्र ती गर्भवती आहे हे आम्हाला माहितच नव्हते, असे तिच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तिचे पालक याविषयी यंत्रणेला अधिक माहिती देत नाही की आधार कार्डही देत नाहीये. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करणे अशक्य होत आहे.

पालकांचे दुर्लक्ष करते आयुष्य उद्ध्वस्त
अशा प्रकारच्या घटना वाढत आहे. यासाठी पालकांनी मुला-मुलींच्या हालचाली, त्यांची वागणूक याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुलीची मासिक पाळी नियमित येते की नाही, याकडे मुलीच्या आईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच मुलाच्याही चुकीमुळे एखाद्या मुलीने बाळाला जन्म दिला व तशी तक्रार झाल्यास थेट बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे पालकांचे दुर्लक्ष झाल्यास मुलगा असो की मुलगी या दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.

तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियावर नको ते प्रसंग सहज उपलब्ध होऊ लागल्याने मुले-मुली त्याच्या आहारी जात आहे. त्यामुळे अविवाहीत असतानाच मुलींना गर्भधारणा होते. यात अनेक वेळा मुलगा हा नात्यातीलच असतो. त्यामुळे मुलगा असो की मुलगी यांच्या हालचाली, त्यांच्यातील बदल याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेेचे आहे. कायद्याने होणाऱ्या कारवाईसाठीदेखील आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची असून लैंगिक शिक्षण काळाची गरज झाली आहे.
- डॉ. उदयसिंग पाटील, ट्रेनर ऑफ ट्रेनर, सुरक्षित गर्भपात मार्गदर्शन संस्था (आय-पास)

Web Title: three minor became virgin mothers, Three incidents in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव