तिघांना रेल्वेगाडीने चिरडले
By admin | Published: February 12, 2017 12:55 AM2017-02-12T00:55:46+5:302017-02-12T00:55:46+5:30
नरडाणा-होळदरम्यानची घटना : चिमुरडीसह महिला बेपत्ता
नरडाणा : नागपूरहून सुरतकडे जाणारी प्रेरणा एक्स्प्रेसने शनिवारी नरडाणा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर असलेल्या होळगावानजीक तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्यासोबत असलेली महिला व तिची लहान मुलगी या दोघी मात्र बेपत्ता आहे. हे सर्व मुळचे बाम्हणे ता.अमळनेर येथील राहणार असून हल्ली म्हळसर ता.शिंदखेडा येथे राहत होते.
पिंटू आसाराम भिल, (३५), शिवदास भिल (२१), मोठाभाऊ भिल (१८, रा. सर्व बाम्हणे, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे मयतांची नावे आहेत.त्यांच्यासोबत असलेले विठाबाई पिंटू भिल (२५) व व अक्काबाई पिंटू भिल या दोघांचा अद्याप तपास लागलेला नाही. रात्रीउशीरा रेल्वे लाईनवर काय करत होते, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
सर्वच जण अमळनेर तालुक्यातील
भुसावळहून आलेली प्रेरणा एक्सप्रेस नरडाणा रेल्वे स्टेशनवरून ७ वाजून ३२ मिनीटांनी पास झाली. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या होळ गावानजीक या सुपरफास्ट रेल्वेच्या खाली चिरडून तिघांचा मृत्यू झाल्याचे रेल्वे विभागाचे मोटरमन यांच्या लक्षात आले. त्यांनी मग पहिले ही माहिती रेल्वे पोलीस स्टेशनला दिली. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह रेल्वे पोलिसांना सापडले.
बेपत्ता असलेले विठाबाई आणि त्याची मुलगी अक्काबाई या दोघांना शोधण्याचे काम नरडाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, रेल्वे पोलीस व नरडाणा गावातील ग्रामस्थ घेत होते.
मजुरांचा रेल्वे विभागाशी संबंध नाही
रेल्वेखाली चिरडल्यानंतर संबंधित सर्व मजूर रेल्वे विभागातील असावे, काही तरी काम करण्यासाठी ते येवढ्या रात्री गेले असावे, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. परंतु, या सर्व मजुरांचा रेल्वे विभागाशी काहीही संबंध नसल्याची माहिती नरडाणा रेल्वे स्थानकातील सूत्रांनी दिली आहे.