प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी तीन टप्प्यात शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:45 PM2020-06-01T12:45:23+5:302020-06-01T12:47:35+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आले असून जळगाव शहर व जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून रेड झोनसह (जळगाव मनपा) व जिल्ह्यात इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवेसह इतरही व्यवहार ३ जूनपासून टप्प्याटप्याने सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे परवानगी दिली आहे. मात्र, मॉल्स, चित्रपटगृह, शाळा, बार आणि बाजार संकुले, हॉटेल बंदच राहणार आहे.
लॉकडाउनच्या पाच बाबत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानंतर रविवारी राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनबाबत आदेश काढले. यात जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या आदेशानुसार मॉल, संकूल बाजार येथील दुकाने वगळता इतर एकल दुकाने सुरू होतील.
आदेशानुसार पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होणार असून दुसरा टप्पा ५ जूनला तर ८ जूनला तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या आदेशामुळे एकल दुकान असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला असला तरी जळगाव शहरातील संकुल असलेले फुले मार्केट, गोलाणी मार्केट व इतर संकुल बंद राहणार आहेत.
मनपा क्षेत्र वगळून जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच व्यवहार
जळगाव शहर वगळता तसेच जिल्ह्यात जेथे प्रतिबंधीत क्षेत्र आहे ते क्षेत्र वगळून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने सुरू करण्यास १९ मे रोजीच्या आदेशात परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हे आदेश कायम राहून व्यवहार सुरू राहतील. मात्र जिल्ह्यातीलदेखील हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टारंट, नाश्त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, मॉल, सलून, चित्रपटगृह बंद राहणार आहेत.
लॉकडाउन - ५ बाबत राज्य सरकारने दिलेल्या निर्देशाची जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. टप्प्या- टप्प्याने शिथिलता दिली जाणार आहे. तसेच मॉल बंद असण्यासह बाजार संकुलातीलदेखील दुकाने बंद राहतील.
- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.