चार हजाराची लाच घेतांना तीन पोलिसांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 09:00 PM2023-03-24T21:00:10+5:302023-03-24T21:00:24+5:30
पत्त्यांचा क्लब सुरु ठेवण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या फैजपूर ता. यावल येथील तीन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
फैजपूर, जि. जळगाव :
पत्त्यांचा क्लब सुरु ठेवण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या फैजपूर ता. यावल येथील तीन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. फैजपूर येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
हेमंत वसंत सांगळे (५२, रा. भारत एंटरप्रायजेस मागे, फैजपूर), किरण अनिल चाटे, (४४, रा. विद्या नगर, फैजपूर) आणि महेश ईश्वर वंजारी (३८ रा.लक्ष्मी नगर, फैजपूर) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांचा बामणोदला पत्त्यांचा क्लब आहे. या क्लबवर कारवाई होऊ नये, यासाठी संबंधित बीट हवालदार सांगळे व चाटे यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी केली. यातील एक हजाराची रक्कम वंजारी यांनी घेतली. ही रक्कम घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीनही जणांना अटक केली.
विभागाचे पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, सहायक फौजदार सुरेश पाटील, हे.कॉ.अशोक अहिरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, .किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.