वाळूमाफियांच्या दगडफेकीत तीन पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:56 AM2019-02-24T11:56:43+5:302019-02-24T11:57:26+5:30
जळगाव तालुक्यातील खेडी येथील घटना
जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर वाळूमाफियांनी तुफान दगडफेक केली. यात तीन पोलीस जखमी झाले. तालुक्यातील खेडी येथील गिरणा नदी पात्रात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी १५ जणांविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पाटील, तौसिफ पठाण व ज्ञानेश्वर चव्हाण अशी या जखमी पोलिसांची नावे आहेत. दरम्यान, वाळूमाफियांनी ट्रॅक्टरसोडून पलायन केले आहे. हे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे.
खेडी शिवारात गिरणा पात्रात अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार शिंदे यांनी शुक्रवारी रात्री नियंत्रण कक्षातून एक पथक रवाना केले. हे पथक नदीपात्रात पोहचताच १० ते १५ जणांच्या टोळक्याने पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक करायला सुरुवात केली. तरीही पोलिसांनी धाडस करीत ते भरलेल्या ट्रॅक्टरपर्यंत पोहचले. या दगडफेकीत वरील तीन पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी या वाळू पकडण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार असल्याने पसार झाले. दरम्यान, या पोलिसांवर उपचार करुन त्यांची लगेच घरी पाठविण्यात आले. याप्रकरणी प्रकाश मन्याराम वाघ यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा वापर
वाळू वाहून नेण्यासाठी वाळूमाफियांनी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा वापर केला आहे. प्रत्येक ठिकाणी विना क्रमांक किंवा बनावट क्रमांकाचा वापर होत असल्याचे वेगवेगळ्या कारवायांवरुन सिध्द झाले आहे.खेडी येथील कारवाईतही ट्रॅक्टरचे धूड नवीन तर नंबर खोडलेल्या ट्रॉलीचा वापर करण्यात आला आहे. वाळूसहीत सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनीच हे ट्रॅक्टर चालवून पोलिस ठाण्यात आणून जप्त केले आहे. याप्रकरणी प्रकाश मन्याराम वाघ यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.