मारहाण प्रकरणी तीनही पोलिसांची नाशिक कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:23 PM2019-06-18T12:23:17+5:302019-06-18T12:23:53+5:30

गुन्ह्यात कलम वाढविले

Three policemen will be sent to Nashik Jail for the assault case | मारहाण प्रकरणी तीनही पोलिसांची नाशिक कारागृहात रवानगी

मारहाण प्रकरणी तीनही पोलिसांची नाशिक कारागृहात रवानगी

Next

जळगाव : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत प्रौढाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केलेला हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांची मध्यरात्री नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचे कलम (३६४) वाढविण्यात आल्याची माहिती माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.
मुकेश याचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग होता तर सुरेश सपकाळे व गोरख पाटील हे चिंग्याला सोडून घरी निघून गेले. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला. दरम्यान, या तीनही निलंबित कर्मचाऱ्यांना मुख्यालय पोलीस मुख्यालय देण्यात आले आहे. खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या चिंग्या उर्फ चेतन आळंदे याला या पोलिसांनी न्यायालयातून थेट कारागृहात न नेता त्याच्यासोबत खासगी चारचाकी वाहनाने तुकारामवाडीत नेले होते. तेथे चिंग्याने अरुण भिमराव गोसावी यांना मारहाण करुन कारमध्ये डांबून ठेवले होते. या प्रकरणी चेतन आळंदे, लखन मराठे, हवालदार मुकेश पाटील, सुरेश सपकाळे व गोरख पाटील यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिकला हलविण्यावरुन वाद
रविवारी न्यायालयाने अटकेतील तिनही पोलिसांची पोलीस कोठडीचा हक्क राखून कारागृहात रवानगी केली, मात्र सायंकाळी कारागृह प्रशासनाने पोलिसांना येथील कारागृहात ठेवण्यास मनाई करुन नाशिक कारागृहात पाठविण्याचा सल्ला दिला. रात्री उशिरापर्यंत पोलीस व कारागृह प्रशासन यांच्यात वाद सुरु होता. शेवटी तिघांना मध्यरात्री नाशिक कारागृहात पाठविण्यात आले. याच प्रकरणाशी संबंधित गुन्हागार चिंंग्या व लखन मराठे या कारागृहात आहेत.
गार्ड ड्युटीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी
चिंग्या आतापर्यंत किती वेळा न्यायालयात तारखेवर आला व किती वेळा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्या-त्यावेळी कोणत्या कर्मचाºयाची गार्ड ड्युटी होती, याचीही चौकशी केली जात आहे. कारागृहात गेल्यावर कोणत्या आरोपीसोबत कोणी असावे याच्या जोड्या कोण लावतो याचीही माहिती घेतली जात आहे. १३ रोजी गार्ड ड्युटीला एकूण किती कर्मचारी होते, त्यांचीही चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व कर्मचाºयांना मंगळवारी पोलीस अधीक्षकांच्या दालनात बोलावले जाणार आहे.
गुन्ह्यातील कार जप्त
गोसावी यांना ज्या कारमध्ये डांबून ठेवण्यात आले, ती कार (क्र.एम.एच.१९ सी.यु.८५००) पोलिसांनी जप्त केली आहे. या कारचा मालक कोण?, चिंग्याजवळ ही कार कशी आली याची चौकशी आता पोलीस करीत आहेत.
मद्यपी पोलिसाला सक्तीची सेवानिवृत्ती...
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या अशोक पटवारी या कर्मचाºयाला सोमवारी सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. याबाबत पोलीस अधीक्षकांनी सायंकाळी आदेश जारी केले. यापूर्वी या कर्मचाºयाची विभागीय चौकशी सुरु होती. ड्युटीवर असताना सतत मद्यप्राशन करण्याच्या कारणावरुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चिंग्याला आतापर्यंत किती वेळा न्यायालयात नेण्यात आले व त्यावेळी गार्ड ड्युटीला कोणते कर्मचारी होते, याची चौकशी केली जात आहे. गुन्हेगारांना मदत करणाºया कोणत्याही कर्मचाºयाला पाठीशी घातले जाणार नाही. भविष्यात वादाच्या घटना टाळण्यासाठी अशा वादग्रस्त गुन्हेगारांचे न्यायालयीन कामकाज व्हीडीओकॉन्फरन्सद्वारे घेण्याबाबत न्यायालयाला विनंती करु.
- डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

Web Title: Three policemen will be sent to Nashik Jail for the assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव