भुसावळात तीन खासगी कोविड सेंटर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:18 AM2021-05-27T04:18:57+5:302021-05-27T04:18:57+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले होते. शासकीय रुग्णालय फुल्ल झाल्यामुळे शहरात खासगी रुग्णालयांना कोरोनावर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले होते. शासकीय रुग्णालय फुल्ल झाल्यामुळे शहरात खासगी रुग्णालयांना कोरोनावर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मध्यंतरी कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने त्या ठिकाणीही त्या वेळेस बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना अक्षरश: कोठेही पडावे लागत होते. मात्र आता कोरोनाची लाट बऱ्याचअंशी ओसरत आहे.
जिल्ह्यात जळगाव, चोपडानंतर सर्वात जास्त रुग्ण भुसावळ तालुक्यात आढळले होते. भुसावळला सद्य:स्थितीत १२ हजार ९६० बाधित रुग्ण आहेत. यापैकी ११ हजार ९८१ रुग्ण बरे झाले असून, ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ७१५ रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत.
शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. याकरिता शासनाने खासगी रुग्णालयांना कोरोनावर उपचार करण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे नागरिकांसाठी शुभवर्तमान आहे. रुग्णांअभावी शहरातील साईपुष्प कोविड हॉस्पिटल कोविड सेंटर, श्री रिदम हॉस्पिटल कोविड सेंटर व प्रतिभा कोविड सेंटर तूर्त बंद झाले आहेत. याशिवाय शासनाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटर हेसुद्धा तूर्त बंद केले आहे.
समर्पण हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालती हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये सहा, रेल्वे हॉस्पिटल येथे १२८ पैकी ११८ बेड रिक्त झाले असून, केवळ दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण रुग्णालयात ५० बेडची उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी सद्य:स्थितीत ३२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुस्कान कोविड सेंटरमध्ये फक्त एका रुग्णावर उपचार सुरू आहे. याशिवाय सरोदे रुग्णालय कोविड सेंटरमध्ये ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकंदरीत अगदी बोटावर मोजण्याइतक्या रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालय कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
ट्रामा सेंटरमध्ये होणार नॉनकोविड रुग्णांवर उपचार
शहरातील जळगाव रोडवर साकेगावलगत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात ५० बेडच्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. नंतर बाजूला असलेल्या ट्रामा सेंटरमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता अतिरिक्त ५० बेड रुग्णांसाठी टाकण्यात आले होते. एकूण या ठिकाणी १०० बेड कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध होते, मात्र ट्रामा सेंटरमध्ये फक्त नॉनकोविड रुग्णांसाठी उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन सुरू आहे. येत्या सोमवारपासून या ठिकाणी नाॅनकोविड रुग्णांसाठी उपचार करता येईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी मयूर चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.