पारोळा येथे आगीत तीन दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:36 PM2019-03-20T22:36:01+5:302019-03-20T22:37:49+5:30

गावहोळी चौकात शिरसमणीकर ज्वेलर्समधील वीज मीटरने अचानकपणे पेट घेतल्याने या दुकानाला आग लागली. त्यानंतर या दुकानाच्या दोन्ही बाजुला असलेले एक सारस्वत किराणा व दुसरे सुनील ड्रेसेस ही दोन्ही दुकानेही आगीच्या लपेटात येऊन त्यात तेही जळून खाक झाले.

Three stores in the blaze fire at Parola | पारोळा येथे आगीत तीन दुकाने खाक

पारोळा येथे आगीत तीन दुकाने खाक

Next
ठळक मुद्देदीड कोटींची हानीआग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळलाआमदार डॉ.सतीश पाटील यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवरदुकानदारांना केली प्रत्येकी २५ हजारांंची मदतगावहोळी चौकातील होळी पेटली नाही

पारोळा, जि.जळगाव : बाजारपेठेतील गावहोळी चौकात शिरसमणीकर ज्वेलर्समधील वीज मीटरने अचानकपणे पेट घेतल्याने या दुकानाला आग लागली. त्यानंतर या दुकानाच्या दोन्ही बाजुला असलेले एक सारस्वत किराणा व दुसरे सुनील ड्रेसेस ही दोन्ही दुकानेही आगीच्या लपेटात येऊन त्यात तेही जळून खाक झाले. या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी सहाला ही घटन घडली.
शिरसमणीकर ज्वेलर्समधूून अचानक धूर निघत असल्याचे रमेश अमृतकर या शेजारील रहिवाशी दुकानदाराच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ या दुकानाचे मालक सुनील भालेराव यांना बोलून घेतले. भालेराव यांनी दुकानाचे शेटर उघडले असता धूर व आगीचे लोट बाहेर येऊ लागले. त्यात सुनील यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्यांना तेथून बाजूला केले. तत्काळ अग्निशमन बंब बोलविण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण दुकानात हवा शिरल्याने आगीने उग्ररूप धारण केले. या आगीच्या लपेटात सुनील ड्रेसेसचा वरचा मजला व बाजूला असलेले स्वारस्वत किराणा दुकान आले, तर समोरील राधिका ज्वेलर्स या दुकानाचे पुढील सर्व शो व मीटरचे नुकसान झाले.
शिरसमणीकर ज्वेलर्सचे मालक सुनील प्रभाकर भालेराव यांनी १२ लाख रुपये कर्ज काढून आपल्या जुन्या दुकानाचे नूतनीकरण करून २६ जानेवारीपासून नव्या दुकानाचा शुभारंभ केला होता. मेहनतीने उभारलेले दुकान दोन महिन्यांनंतर असे आगीत बेचिराख झाले. या दुकानातील सर्व फर्निचर, पंखे, संगणक, सोफे, काच कॅबिन, शोच्या वस्तू, विक्रीसाठी आणलेल्या सोन्याच्या व चांदीच्या वस्तू या आगीत जळून खाक झाल्यात. सोन्याच्या वस्तू वितळून त्यांचे पाणी झाले. हे सर्व पाहताच सुनील भालेराव यांना भोवळ आली. आपले सर्व काही जळून खाक झाले. आपण रस्त्यावर आलो, असे सांगत त्यांना रडू कोसळले. त्यांचे एकूण ४०-४५ लाखांचे नुकसान यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्यात व्यक्त करण्यात आला.
यात डाव्या बाजूला असलेले सुनील ड्रेसेस यांच्या दुकानाच्या मजल्यावर आगीने लक्ष्य करीत मालक इशांत जैन यांनी विकण्यासाठी आणलेले ड्रेस मटेरीयल जळून खाक झाले आणि दुकानाचे फर्निचर, इतर साहित्य व दुकानाचा शो असे आगीत खाक झाले. यात सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
याशिवाय या दुकानाच्या उजव्या बाजूला असलेल्या सारस्वत या किराणा दुकानातील माल जळून खाक झाला. तसेच घरात लग्न असल्याने मुलाचा लग्नाचा बस्ता व दागिने जळून १५ लाखांचे नुकसान झाले झाले.
आमदार डॉ.सतीश पाटील यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
बाजारपेठेत एवढी भीषण आग लागली तरी वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी येत नाही. विचारणादेखील करीत नाही. याचा रोष व्यक्त करीत आमदार डॉ.सतीश पाटील यांनी अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले. या आपद्ग्रस्त दुकानांच्या समोर एक धोकादायक वीज खांब आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो खांब हटविण्याची मागणी झाली. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सर्व्हिस वायरचा मोठा गुंता त्या खांबावर आहे. त्यामुळेच ही आग लागली, असे नागरिकांनी सांगितल्यावर आमदार डॉ.पाटील यांनी वीज कंपनीने ही जबाबदारी स्वीकारूनही नुकसानभरपाई द्यावी, असे कडक शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले.
दुकानदारांना केली प्रत्येकी २५ हजारांंची मदत
या आगीत नुकसान झालेल्या प्रत्येक दुकानदाराला आमदार डॉ.सतीश पाटील यांनी २५ हजार रुपयांची रोख मदत करीत दिलासा दिला.
गावहोळी चौकातील होळी पेटली नाही
होळीच्या दिवशी या दुर्दैवी आगीत तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. यामुळे गावहोळी चौकातील होळी यावर्षी न पेटवण्याचा निर्णय युवकांनी घेतला.
पंचनामा- शहर तलाठी निशिकांत पाटील व गौरव लांजेवार यांनी या आगीच्या घटनेचा पंचनामा केला. त्यात त्यांनी शिरसमणीकर ज्वेलर्स यांचा ४० ते ४५ लाख व सुनील ड्रेसेस यांचा ९० लाख व सारस्वत किराणा दुकानदाराचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.
यांनी आग विझविण्यासाठी केली मदत
आग विझविण्यासाठी अग्निशमन बंबाचे चालक मनोज पाटील, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, नगरसेवक मनीष पाटील, नितीन सोनार, विजय पाटील, रवी महाजन, आकाश महाजन, अनिल वाणी, छोटू वाणी, मयूर मालपुरे, रवी वाणी यांनी मदत केली.
यांनी दिल्या भेटी
घटनास्थळी आमदार डॉ.सतीश पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, सुरेंद्र बोहरा यांनी दिल्या व नुकसानग्रस्त दुकानदारांना धीर दिला.

Web Title: Three stores in the blaze fire at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.