सततच्या पावसाने रस्त्यांचे तीन-तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 09:35 PM2019-10-27T21:35:46+5:302019-10-27T21:35:52+5:30
वाढते अपघात : यावलच्या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत
यावल : सततच्या पावसाने शहरासह तालुक्यातील रस्त्यांचे तीन-तेरा वाजले असून वाहनधरकांना वाहने चालवतांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा यामुळे अपघातही घडत आहेत.
बºहाणपुर - अंकलेश्श्वर महामार्गावर शहरातील बुरूज चौकापासून तर भुसावळ पर्यंत खड्डेच खड्डे पडले असल्याने वाहने चालवतांना कसरत करावी लागत आहे. येथील बुरूज चौकाजवळील रस्त्यात तर चार फुट यासाचे आणि सुमारे एक फुट खोलीचे खड्डे पडले आहेत. यात पाणी साचल्याने खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात.
१५ दिवसापुर्वीच म्हणजे निवडणुकी दरम्यान मतदारांचा संताप होवू नये म्हणून बांधकाम विभागाने थातुर-मातुर दुरूस्ती केली होती. नेमक्या त्याच ठिकाणी दुरूस्ती केली मात्र या कामाचे तीन तेरा वाजले असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.
मोठ्या खड्डयामुळे ट्रॉली उलटली
रविवारी यावल येथील शेतकरी नाना महाजन हे त्यांच्या शोतील ज्वारी बाजार समीतीमध्ये विक्रीस आणत असतांना बुरूज चौकाजवळ रस्त्यातील खड्डयात ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक गेल्याने ट्रॉली उलटली. त्यामुळे ट्रॉलीमधील संपुर्ण १५ क्विटल ज्वारी ज्वारी रस्त्यावर सांडली. रस्त्यात सर्वत्र पाणीच पाणी व चिखल असल्याने ज्वारीचे संपुर्ण नुकसान झाले असून महाजन यांना ऐन दुष्काळी स्थितीत सुमारे १८ हजारांचा फटका बसला आहे. केवळ खड्डयामुळे हा अपघात झाला असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.