राज्याच्या सरासरीपेक्षा जळगावात कोरोनाच्या तीन हजार चाचण्या कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:13 PM2020-07-11T12:13:51+5:302020-07-11T12:14:05+5:30
तपासण्या वाढविण्याची गरज : दहा लाख लोकसंख्येमागे साडेसात हजार लोकांची तपासणी
जळगाव : राज्याच्या सरासरीपेक्षा जळगावात अद्यापही तीन हजार चाचण्या कमी झालेल्या आहेत़ दर दहा लाख लोकसंख्येमागे किमान ९ हजार चाचण्या अपेक्षित असताना जळगावात त्या सहा हजारापर्यंत झाल्या असल्याची कबुली कोविड रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आयसीएमआरच्या निर्देशानुसार जळगावात सरासरीपेक्षा कमी चाचण्या होत असल्याचा मुद्दा मांडला होता. यावर वरील माहिती देण्यात आली आहे.
दहा दिवसांपासून चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत़ त्या आधी अत्यंत कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याचे चित्र होते़ संशयित रुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आल्याने दिवसाला सुमारे ९०० चाचण्या केल्या जात आहेत़ दरम्यान, आठवडाभरापूर्वी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीतही या चाचण्या चार हजारांनी कमी असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता़
२८९ कुटुंब अन् ९० टक्के बाधित
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाभरातील २८९ कुटुंब व त्यातील ९० टक्के सदस्य बाधित आढळून आले आहेत़ यामुळे त्यांचे संपर्क कमी व त्यामुळे चाचण्या कमी झाल्याचे प्रशासनाकडून समोर येत आहे़ एका कुटुंबाच्या एका व्यक्तिचे जेवढे, तेवढेच अन्य व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट या आधारावरच तपासण्या झाल्या़ त्यामुळे या चाचण्या कमी झाल्या व त्यामुळेच जळगावचा मृत्यूदर सर्वाधिक ठरला, असेही गणित मांडले जात आहे़ प्रत्येक रुग्णामागे त्याच्या संपर्कातील किमान १५ जणांची आरोग्य तपासणी गरजेची आहे़
शहरात कमी तपासणी
केंद्रीय समितीच्या पाहणीतही शहरात कमी चाचण्या होत असल्याचा मुद्दा नवल कॉलनीतील पाहणीदरम्यान समोर आला होता़ या ठिकाणी १२ बाधित आढळले असताना केवळ २३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती़ यावर केंद्रीय पथकानेही आश्चर्य व्यक्त केले होते. प्रत्येक रुग्णामागे किमान दहा लोकांची तपासणी आवश्यक आहे.