लसीकरणाचे शहरात आजपासून तीन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:07+5:302021-02-08T04:14:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना लसीकरणासाठी शहरात आणखी एका खासगी रुग्णालयात केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लसीकरणासाठी शहरात आणखी एका खासगी रुग्णालयात केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांच्यासह काही प्रमुख अधिकाऱ्यांनी या केंद्राची पाहणी करून या ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑर्किड हॉस्पिटलमध्ये सोमवारपासून हे तिसरे केंद्र सुरू होणार असल्याचे डॉ. रावलानी यांनी सांगितले.
शहरात सुरुवातील डी.बी. जैन रुग्णालयात लसीकरणाचे केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, कोणाला काही गंभीर रिॲक्शन आल्यास त्याला रुग्णालयात नेताना अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊन हे केंद्र बदलण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या होत्या. मात्र, महापालिकेकडे अन्य ठिकाणी पुरेशी जागा नसल्याने अखेर गोल्ड सिटी आणि गाजरे हॉस्पिटल या दोन ठिकाणी ही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती. या ठिकाणी कधी कधी शंभरापेक्षा अधिक एका दिवसाला लसीकरण होत होते. आता महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचारी वाढल्याने आणखी एक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर रविवारी डॉ. राम रावलानी यांनी ऑर्किड हॉस्पिटलला पाहणी केली.
शहरात २०२९ लसीकरण
शहरातील आरोग्य कर्मचारी आणि दोन दिवस महसूल व पोलीस प्रशासन असे मिळून दोन केंद्रांवर २०२९ लोकांनी लस घेतली आहे. नियमित या ठिकाणी ७० ते ८० टक्के टार्गेट पूर्ण होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी गाजरे हॉस्पिलला ८५, तर गोल्ड सिटी येथे ६३ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. शहरात कोणालाही गंभीर रिॲक्शन अद्याप आलेली नाही, लस सुरक्षित असून, कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी लस टोचून घ्यावी, असे आवाहन प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.