रत्नापिंप्रीसह परिसरातील तीन गावांना भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:38 PM2018-01-05T18:38:00+5:302018-01-05T18:40:57+5:30
पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री, दबापिंप्री आणि होळपिंप्री या तीन गावात ऐन हिवाळ्यातही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
आॅनलाईन लोकमत
रत्नापिंप्री ता. पारोळा, दि.५ : उन्हाळ्याला अद्याप तीन महिने बाकी असतांनाच रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री गावात गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अबालवृद्ध पाण्यासाठी वणवण भटकत असून महिलांना तर दररोजची पायपीट नशिबी आली आहे. एवढेच काय पाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही शाळा बुडवून रानोमाळ भटकावे लागत आहे. पाणी समस्येवर मात करण्यासाठी गृप ग्रामपंचायतीचे प्रयत्न असले तरी ग्रामस्थांना बसणारी झळ कायम आहे.
रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावासाठी गृप ग्रामपंचायत असून पाणी पुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरीची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र या विहिरीच्या पातळीतही कमालीची घट दिसून येत आहे. त्यामुळे या तिन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण जात आहे. गृप ग्रामपंचायतने धरणावरील विहिर खोदकाम सुरू केले असले तरीही गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी हे प्रयत्न कमीच पडत आहे. ग्राम पंचायतीने सुरू ठेवलेले प्रयत्न असफलच होतांना दिसत आहेत .
रत्नापिंप्री गृपग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरी असून गावात दोन जलकुंभ तसेच नविन योजनाही देण्यात आली आहे. परंतु पाणीटंचाईची गंभीर समस्या न सुटल्याने वणवण भटकावे लागत आहे. गावातील सार्वजनिक विहिरींचेही खोलीकरण करणे गरजेचे आहे.
सध्या इतर वापराच्या पाण्यासाठी व्यवस्था करणे देखील कठीण बनले आहे. रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा आता गावातीलच सार्वजनिक ठिकाणी दोन नळांव्दारे करण्यात आला असला तरी मात्र येथून पिण्यापुरतेच पाणी उपलब्ध होत आहे. मात्र या व्यतिरिक्त गुरेढोरे यांच्या पिण्यासाठी पाणी तसेच घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने जो तो आपआपल्या शेती परिसरात जाऊन पाण्यासाठी फिरतांना दिसत आहेत.