वाकोदसह तीन गावांना टँकरची गरज
By admin | Published: May 20, 2017 12:30 AM2017-05-20T00:30:37+5:302017-05-20T00:30:37+5:30
जामनेर तालुकाही होरपळू लागला : पाणीटंचाईची तीव्रता वाढली, वाकोदचा प्रस्ताव पडून
जामनेर : दिवसेंदिवस वाढणा:या तापमानामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तिव्रतेत वाढ होत आहे. वाघूर नदीच्या काठावरील वाकोद गावास गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने ग्रासले असून यावर ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली होती. तथापि वाकोदचा टँकरचा हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पडून असल्याचे सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे जनतेला पाणीटंचाईचा दररोज सामना करावा लागत आहे. त्यांना मिळेल तेथून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे.
दरम्यान, तालुक्यातील मोहाडी व खर्चाणे या गावांकडूनदेखील पाण्याच्या टँकरची मागणी आल्याने पंचायत समितीने प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता जाणवली नाही. तथापि कोदोली, सारगांव, काळखेडे, चिंचोली पिंप्री, वडगांव बुद्रूक, नांद्रा प्र. लो , तिघ्रे, वडगाव या गावात विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांकडून मिळाली.
वाकोदला पंधरा दिवसातून पाणीपुरवठा
वाकोद हे दहा हजार लोकसंख्येचे गाव असून येथे बारा ते पंधरा दिवसातून पाणीपुरवठा होतो. या गावाला तोंडापूर धरणातून पाणी पुरविले जाते, मात्र खंडित वीजपुरवठा व वारंवार फुटणा:या जलवाहिनीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. ग्रामपंचायतीने जैन उद्योग समूहाच्या विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू केला. टंचाईची तीव्रता पाहून ग्रामपंचायतीने दोन टँकरची मागणी केली आहे.
दरम्यान, सुटीमुळे व गटविकास अधिकारी रजेवर असल्याने टँकरचे प्रस्ताव पं. स. त पडून होते, आता ते तहसीलदारांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मे अखेर्पयत टंचाई स्थितीत वाढ होण्याची शक्यता असून टँकरच्या मागणीतदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.