विशीतील तीन तरुणांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:28 AM2020-12-03T04:28:23+5:302020-12-03T04:28:23+5:30
अमळनेर : दोन दिवसांतील घटनांनी पालक हादरले संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : अवघ्या दोन दिवसांतच तालुक्यातील ...
अमळनेर : दोन दिवसांतील घटनांनी पालक हादरले
संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : अवघ्या दोन दिवसांतच तालुक्यातील विशीतील तीन तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने पालक वर्ग हादरला आहे. यातील दोन जण एकुलते होते. घरातील वारसच गेल्याने कुटुंबीयांसमोर मोठाच प्रश्न उभा राहिला आहे.
तीनही तरुण तालुक्यातील पश्चिम भागातील जानवे -मंगरूळ या एकाच जि.प. गटातील असल्याचा दुर्दैवी योग आहे.
तालुक्यातील मंगरूळ येथील वैभव हितेंद्र पाटील (२२) या तरुणाचा २९ रोजी सायंकाळी स्वतःच्या घरीच हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याला दोन बहिणी आहेत. तो एकुलता असल्याने घराचा वारसच गेल्याने कुटुंबात आणि गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशीच घटना मूळचा डांगर, ता. अमळनेर येथील रहिवासी असलेला व सध्या दाजिबानगरमध्ये राहणारा रोहित उर्फ विकी राजेंद्र पाटील (२०) हा ३० रोजी घरात जेवत असताना त्याच्या श्वासनलिकेत अन्न अडकल्याने त्यालाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला.
रोहितच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याला दोन बहिणी असून, तोही घरातील एकुलता मुलगा होता. डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी तो जाणार होता, पण त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली.
तिसरी घटना वाघोदे येथील असून, ज्ञानेश्वर उर्फ लखन कीर्तीलाल पाटील (२०) याच्या गॅरेजचे तीन दिवसांनी पुण्याला उद्घाटन होते, पण तत्पूर्वी ३० रोजी त्यालादेखील हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला ज्ञानेश्वर हा वाघोद्याचे उपसरपंच कीर्तीलाल पाटील यांचा मुलगा होत.
तीनही तरुणांना आलेला हृदयाचा झटका एवढा तीव्र होता की त्यांच्यावर उपचार करण्याचा अवधीदेखील मिळाला नाही. तरुणांमध्ये हृदयविकाराचा त्रास उद्भवल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकाराची कारणमीमांसा होणे गरजेचे असून, तरुणांनी सावधानता बाळगण्याचे व जनजागृती करणे आवश्यक आहे.
कोट
यंग एमआयचे प्रकार सध्या वाढले आहे. तरुण अनावश्यक ताण घेतात. मोबाइलमध्ये गुंतून राहतात. पुरेसा व्यायाम व पोषक आहार न घेता घाईत जेवण करणे आदींमुळे तरुणांच्या शरीरावर परिणाम होऊ लागले आहेत त्यामुळे असले प्रकार वाढत आहेत.
- डॉ. संदीप जोशी, हृदयविकार तज्ज्ञ, अमळनेर