दसनूरच्या तीन युवकांनी केळी केली परदेशात निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 11:16 PM2021-06-01T23:16:40+5:302021-06-01T23:17:06+5:30
दसनूर येथील तीन मित्रांनी एकत्र येऊन ३९ कंटेनर केळी परदेशात निर्यात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
निंभोरा बुद्रुक, ता.रावेर : येथून जवळच असलेल्या दसनूर येथील तीन मित्रांनी एकत्र येऊन ३९ कंटेनर केळी परदेशात निर्यात केली आहे.यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला भाव त्यांच्यामुळे मिळाला आहे.
मागील वर्षी लाँकडाऊन काळात अनेक युवकांना कंपन्या बंद पडल्याने नोकरी सोडून घरी यावे लागले हे चित्र अतिशय भयावह होते. हे बघून शहरात नोकरीला जाण्याचे स्वप्न उराशी बाळगनारे प्रणव महाजन (बी.सी.ए), जयेश महाजन (बी.एस.सी), शुभम महाजन( बारावी) या तिघांनी एक विचार करून शहरात नोकरीला न जाता आपल्या गावातच राहून उद्योग करायचे ठरवले. शेतीचे चित्र पहाता केळी या पिकाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने त्यांनी केळी पीकाची निर्यात परदेशात करायचे ठरवले. मनात जीद्द धरून परदेशात केळीला भाव असल्याने संपूर्ण चौकशी करून हळूहळू केळी परदेशात निर्यात केली.
यात त्यांना गावातील शेतकऱ्यांची साथ मिळाली. विश्वासाचा हात मिळाला व घरातून पाठबळ मिळाल्याने त्यांनी बघता बघता एका वर्षात ३९ कंटेनर केळी परदेशात निर्यात केली. यात सुमारे ८०० टन केळी निर्यात झाली. सुरवातीला शेतकऱ्यांचा विश्वास मिळवत केळी घेण्यासाठी खुप मेहनत करावी लागली. त्यात त्यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला पण मनात जिद्द अटळ होती. या मुळे त्यांना केळीला चांगला भाव पण मिळाला तसेच भावात होणारी शेतकऱ्यांची लुट थांबवण्यात काहीसे यश पण आले. यामुळे शेतकरी वर्गानेही समाधान व्याक्त केले आहे. लवकरच एकूण १०० कंटेनर परदेशात निर्यात करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.