डोळयात मिरचीची पूड फेकून रस्तालूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 07:20 PM2020-10-05T19:20:43+5:302020-10-05T19:21:53+5:30
तीन युवकांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून दिव्यांग व्यावसायिकाला २० हजारात लुटल्याची घटना कमानी तांडा ते जांभूळ गावाच्या दरम्यान रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली.
मनोज जोशी
पहूर ता. जामनेर : तीन युवकांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून दिव्यांग व्यावसायिकाला २० हजारात लुटल्याची घटना कमानी तांडा ते जांभूळ गावाच्या दरम्यान रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. रस्ता लुटीसाठी वापरलेला बनावट कट्टा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोपाल सुखदेव भिवसने उर्फ चड्डी बाळू, अनिकेत कडूबा चौथे उर्फ दाऊद (रा. पहूर कसबे) आणि चेतन प्रकाश जाधव यांचा समावेश आहे. यातील सुखदेव याचे राजेद्र यांच्या दुकानात येणे जाण्याचा नेहमी संपर्क असून रविवारी पाळत ठेवून होता.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र धोंडू पाटील या दिव्यांगाचे पहूर येथे कृषी निविष्ठा दुकान आहे. दररोज जांभूळ ते पहूर दुचाकीवरून ते ये_जा करतात. रविवारी रात्री ९ वाजेच्या राजेंद्र पाटील हे २० हजाराची रोकड घेऊन अविनाश संजय पवार या साथीदरासह घराकडे निघाले.
कमानी तांडा व जांभुळ गावाच्या दरम्यान दुचाकीवरून तीन युवक मागावून आले आणि त्यांनी राजेद्र यांच्या डोळयात मिरचीची पूड फेकली. डोळयात पूड गेल्याने राजेद्र हे दुचाकीसह खाली पडले. ही संधी साधत या तीनही जणांनी त्यांच्याकडील पैसे काढून घेतले आणि जांभूळच्या दिशेने पळ काढला. परिस्थितीचे भान राखून राजेद्र पाटील हे जांभूळकडे न जाता ते कमानी तांडयाकडे परतले. यामुळे त्यांचा आणि सोबतच्या साथीदाराचा जीव वाचला कारण मारेकरी पुढे जाऊन दबा धरुन बसण्याची शक्यता होती.
इकडे राजेद्र हे कमानी तांड्यात पोहोचले. तेथील युवकांना आपबीती सांगितली. पिंपळगाव बुद्रुक येथे रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.याचवेळी तीन जण पिंपळगावकडे येत असल्याची येत असल्याची माहिती काही युवकांना मिळाली. त्यांनी रस्त्यावर टायर टाकून दुचाकीस्वारांना अडविले आणि या तीनही जणांना चांगलाच चोप दिला आणि रात्री १२.३० वाजता या तीनही जणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनास्थळी बनावट गावठी कट्टाही आढळून आला.
पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे यांनी सोमवारी घटनास्थळी जात माहिती घेतली. राजेद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तीन युवकांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.दुचाकी, बनावट कट्टा, एक हजार रोख जप्त केले आहे. सोमवारी जामनेर न्यायालयात हजर केले असता तीनही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.