नाथ प्लाझा येथे फोडले एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:28 PM2019-11-18T22:28:05+5:302019-11-18T22:28:16+5:30
नाथ प्लाझामधील प्रकार : बॅँकेचा सायरन अन् सतर्क पोलीस यंत्रणेमुळे चोरटा जेरबंद
जळगाव : अनेक प्रयत्न करुनही कर्ज फिटत नसल्याने विजय बन्सी अहिरे (३०, रा.खेडी बुद्रुक, जळगाव) या तरुणाने मध्यरात्री गोलाणी मार्केट परिसरातील नाथप्लाझा संकुलातील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडले.मशीनमध्ये छेडछाड होताच अत्याधुनिक यंत्रणेमुळे हैदराबाद येथील मुख्यालयात सायरन वाजला...आणि क्षणातच स्थानिक पोलीस एटीएमजवळ पोहचले. विजय याला बाहेर पडतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
चित्रपटातील कथेप्रमाणेच ही घटना घडली. तोंडाला मास्क, डोक्याला रुमाल तसेच एटीएम फोडण्यासाठी आवश्यक असे सर्व साहित्य घेवून विजय एटीएम फोडण्यासाठी आला होता. त्याच्याकडून पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या बॅगेत दारुच्या दोन बाटल्याही मिळून आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यापूर्वी देखील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एटीएम फोडण्याचा असाच प्रयत्न झाला होता.
गोलाणी मार्केट परिसरात नाथा प्लाझा व्यापारी संकुलात स्टेट बँकेचे एटीएम आहे. या बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड किंवा काही गैरप्रकार होत असल्यास बँकेच्या हैदराबाद येथील कार्यालयात सायरन वाजतो. रविवारी रात्री १.३८ वाजता नाथा प्लाझातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न होताच हैदराबाद येथून शहर पोलीस ठाण्यात फोन खणखणला. ठाणे अंमलदार निलेश बडगुजर यांना फोनवरुन नाथा प्लाझा कॉम्प्लेक्समधील एटीएम फोडण्याचा प्रकार करत असल्याची माहिती मिळाली.
एटीएमच्या बाहेर पडतानाच समोर पोलीस
ठाणे अंमलदार बडगुजर यांनी तत्काळ गस्तीवरील शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील गजानन बडगुजर व भास्कर ठाकरे यांना माहिती कळविली. दोघेही कर्मचारी शाहू नगरात हाणामारीच्या प्रकाराची चौकशी करत होते. मात्र ठाणे अंमलदाराकडून एटीएम फोडण्याच्या प्रकाराची माहिती मिळताच दोघांनी तत्काळ नाथा प्लाझा संकुल गाठले. एटीएम मशीनच्या बाहेर दोघं कर्मचारी थांबले.त्याचवेळी तोंडाला मास्क तसेच पाठीवर बॅग लटकविलेला तरुण एटीएमच्या बाहेर पडला. कर्मचारी गजानन बडगुजर यांनी तत्काळ मोबाईलमध्ये तरुणाचा फोटो काढला, यानंतर तरुणाने तोंडावरील मास्क काढले. बडगुजर तसेच भास्कर ठाकरे यांनी दोघांनी तरुणाची चौकशी केली असता मुंबईला जात असून पैसे काढण्यासाठी आला होतो, अशी खोटी माहिती दिली. कर्मचा-यांनी पैसे निघाले काय अशी विचारणा केल्यावर तरुणाने नाही असे उत्तर दिले. संशय आल्याने बडगुजर व ठाकरे यांनी तरुणाला थांबवून ठेवत एटीएमच्या आतमध्ये जावून पाहणी केली असता, चारही बाजूने एटीएम फोडलेले दिसून आले. त्याला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले.