मेहरूणमधील पक्ष्यांच्या अधिवासाला ओहोटी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 12:33 PM2020-08-08T12:33:46+5:302020-08-08T12:34:03+5:30
पक्षीप्रेमी निराश : नैसर्गिक बेट झाली उध्वस्त, अन्नसाखळी तुटली
जळगाव : काही वर्षांपूर्वी महापालिकेने मेहरूण तलावाची खोदाई करताना नैसर्गिकपणे तयार झालेली बेटेही उध्वस्त केल्याने आणि मानवी वावर वाढून अन्नसाखळीही तुटू लागल्याने मेहरूण तलावात विविध देशी विदेशी पक्ष्यांचा असलेला चिवचिवाट आता क्षीण झाला आहे.
मेहरूण तलाव हे स्थानिकांबरोबरच आता पर्यटकांचेही आवडीचे ठिकाण बनले आहे. एवढेच नव्हे तर जॉगिंगसाठी, निसर्गप्रेमी तसेच पक्षीप्रेमींसाठीही एकेकाळी मेहरूण साद घालत होता. मात्र आता हे जुने चित्र आणखीन जुने झाले आहे. याठिकाणी वाढणारा मानवी वावर, प्रदूषण यामुळे अन्नसाखळीही विस्कळीत झाल्याने येथे पाण्यात मनसोक्त विहार करणाऱ्या तसेच बेटांवर मनसोक्त विश्रांती घेणाºया पक्ष्यांचे चित्र दुर्मिळ झाले आहे.
काही वर्षांपूर्वी मेहरूणमधील गाळाचा उपसा करण्यात आला होता. त्यावेळी या तलावात असलेली नैसर्गिक बेटे ज्यावर पक्षी विश्रांती घेत असत, तीच उध्वस्त करण्यात आली. मानवी वावर वाढल्यामुळे मेहरूणच्या काठी असलेल्या झाडांच्या मुळाशी असणारे कीटक, छोटे खडे हे पक्ष्यांचे मुख्य खाद्यही बंद झाले आहे. त्यामुळे येथे पक्षांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे.
मेहरूण तलावात देशींबरोबरच विदेशी पक्ष्यांचाही पूर्वी वावर होता. याठिकाणी येणारे पक्षी हे बहुतांशी उत्तर धु्रवावरील असतात. या पक्ष्यांची मेहरूणला जास्त करून पसंती असायची.
कारण मेहरूणमधील बेटांवर विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे बसलेले असायचे. पक्षीप्रेमींसाठी ही एक आनंददायी पर्वणी होती. पण मेहरूणला दिसणाºया या पक्षीवैभवाला आता ओहोटी लागली आहे.
का होते उत्तर धुव्रावरील पक्ष्यांचे स्थलांतर.?
उत्तर धु्रवावर काही काळ बर्फाचा वर्षाव होतो. त्यामुळे त्याठिकाणी पक्ष्यांना खाद्य मिळणे मुश्किल होते. त्यामुळे हे पक्षी संमिश्र वा उष्ण वातावरणातील प्रदेशाकडे स्थलांतरित होतात.
या पक्ष्यांचाही होता वावर..
मेहरूण तलावाच्या ठिकाणी पूर्वी शराटी, धनवर, प्लवर, सरीता, टिटवी, मोठे बगळे, पान कावळे, ठिपकेवाला, तुतारी, पांधरा, धोबी, वयक, कुरी अशा दुर्मिळ पक्ष्यांचे आगमन होत होते. मात्र सध्या या पक्ष्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले आहे.
मराठी प्रतिष्ठानतर्फे मेहरूण तलावाच्या ठिकाणी पक्ष्यांचा वावर पुन्हा निर्माण करण्यासाठी येथे बेट निर्माण करणे, पक्ष्यांना लागणारे खडे, कीटक निर्माण होतील, अशी परिस्थिती निर्माण करणे, याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेला प्रस्ताव देण्याचा विचार आहे.
-विजय वाणी, उपाध्यक्ष, मराठी प्रतिष्ठान