जंगलातला वाघ रमला केळीच्या बागेत! अपुरे भक्ष्य आणि जंगलतोडीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 03:54 AM2020-08-30T03:54:10+5:302020-08-30T03:54:55+5:30
जळगाव जिल्हा वनक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. यातील रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील काही वनक्षेत्र यावल वन विभागांतर्गत येते. मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यांतील वढोदा वनक्षेत्राचा भाग हा जळगाव वनक्षेत्रात येतो.
- अजय पाटील
जळगाव : वढोदा वनक्षेत्रातील जंगल असुरक्षित झाल्याने येथील वाघ आता केळीच्या बागेत रमला आहे. वाघांची तिसरी पिढी या बागेत वाढत असून ‘बनाना टायगर’ म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे.
जळगाव जिल्हा वनक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. यातील रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील काही वनक्षेत्र यावल वन विभागांतर्गत येते. मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यांतील वढोदा वनक्षेत्राचा भाग हा जळगाव वनक्षेत्रात येतो. या वनक्षेत्रात पाच ते सहा वाघ असून, यावल वनक्षेत्रात तीन ते चार वाघ आहेत.
वढोदा वनक्षेत्रात वृक्षतोड व अतिक्रमण यामुळे वाघांना राहण्यास जागाच शिल्लक राहिली नाही. या वनक्षेत्रात बाभळी प्रचंड वाढल्या आहेत. तसेच येथे उन्हाळ्यात तापमान प्रचंड असते. अशा परिस्थतीत गारवा मिळावा म्हणून वढोदा वनक्षेत्राला लागून असलेल्या पूर्णा नदीच्या खोऱ्यातील केळीच्या बागांमध्येच आता वाघांनी आपला घरोबा केला आहे.
केळीच्या बागा या वाघांसाठी प्रजनन व शिकारीसाठी उपयुक्त ठरत असल्याने वाघ या बागांत राहणे पसंत करीत असल्याचे वाघांचे अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र नन्नवरे यांनी सांगितले. ‘बनाना टायगर’च्या अस्तित्वासाठी सातपुडा बचाव समितीतील सदस्य अभय उजागरे, राजेंद्र नन्नवरे, वन्यजीव संरक्षण संस्था अनेक वर्षांपासून झगडत आहेत.
ही तर वाघांची मजबुरी
जळगावचा वाघ जरी ‘बनाना टायगर’ म्हणून ओळखला जात असला तरी वाघाला हा अधिवास मजबुरीतून स्वीकारावा लागला आहे. वढोदा वनक्षेत्रात वाढत जाणाºया वेड्या बाभळी, भक्ष्याचा अभाव यामुळे जंगलातील वाघ केळीच्या बागांमध्ये वास्तव्य करीत आहेत.
- किशोर रिठे, संस्थापक अध्यक्ष,
निसर्ग फाऊंडेशन, अमरावती