व्याघ्र संरक्षित जंगलातील वृक्षतोड प्रकरणी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:01 PM2019-12-14T22:01:46+5:302019-12-14T22:11:50+5:30
वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र संरक्षित क्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी भारतीय वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुºहा काकोडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र संरक्षित क्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी भारतीय वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू.पगार यांनी शनिवारी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच स्थानिक आदिवासींसोबत चर्चा केली.
या जंगलात मदापुरी येथील आदिवासींनी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने गुरुवारपासून अवैध वृक्षतोड करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी शेकडो मूल्यवान झाडांची कत्तल केली. याप्रकरणी वढोदा वनविभागाच्या कुºहा येथील कार्यालयात वन क्षेत्रपाल अमोल चव्हाण यांनी अतिक्रमण करणाºया आदिवासीं विरोधात गुन्हे दाखल केले आहे. फासेपारधी जमातीच्या शेकडो महिलांनी वृक्षांची बेसुमार कत्तल केल्यामुळे संपूर्ण वनविभाग हादरून गेला. वनविभागाकडे महिला कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्यामुळे अतिक्रमण करणाºया आदिवासी महिलांपुढे वनविभाग हतबल झाला होता. शनिवारी उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू पगार यांनी घटनास्थळी भेट देवून झालेल्या वृक्षतोडीची पाहणी केली. त्यांच्यासोबत सहायक वनसंरक्षक कांबळे, फिरत्या गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील, सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राहुल वाघ, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे फौजदार नीलेश साळुंके, वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण होते. घटनास्थळी मोठ्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष जमा झाले होते. यावेळी पगार यांनी उपस्थित समूहाला कोणीही अवैध वृक्षतोड करू नये, अशी ताकीद दिली.