सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला वाघाचा ‘तो’ व्हीडिओ जळगाव जिल्ह्यातील नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:47 PM2020-08-19T17:47:24+5:302020-08-19T17:47:39+5:30
वन विभागाची माहिती : त्या क्षेत्राची केली पाहणी ; पण आढळून आला नाही वाघ
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे वेल्हाळा राखेच्या बंडाजवळ व जामनेर तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथील वनात वाघ या शीर्षकाखाली सोशल मीडियावर व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हीडिओ हा जळगाव जिल्हयातील नसून इतर क्षेत्रातील आहे, अशी माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी दिली आहे़
व्हायरल होत असलेला वाघाचा व्हीडिओ हा ९ सेकंदाचा असून त्यामध्ये वाघ मुक्तपणे वावरत असताना दिसून येत आहे. त्या व्हीडिओच्या अनुषंघाने वनविभागामार्फत संबंधित क्षेत्राची तपासणी केला असता या क्षेत्रात वाघ दिसून आला नाही. तसेच व्हीडिओ हा जळगाव जिल्ह्यातील नसून इतर क्षेत्रातील असल्याने नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये. तसेच वाघ वन्यप्राणी वावरतांना आढळून आल्यास तात्काळपणे वन विभागाच्या टोल फ्री नं. १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे़