अमळनेरात टिळक स्मारक समिती शतक महोत्सव सांगता समारंभ १९ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:44 PM2019-12-17T23:44:55+5:302019-12-17T23:46:04+5:30
सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन व राजकीय वैभवाची साक्ष असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सन २०१८-१९ हे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. यानिमित्त संस्थेने वर्षभर शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले. १९ ते २६ डिसेंबर २०१९ पर्यंत सांगता समारंभ होईल.
अमळनेर, जि.जळगाव : शहर व तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन व राजकीय वैभवाची साक्ष असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सन २०१८-१९ हे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. यानिमित्त संस्थेने वर्षभर शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले. १९ ते २६ डिसेंबर २०१९ पर्यंत सांगता समारंभ होईल. अमळनेरकरांना वैचारिक मेजवानी ठरणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती लोकमान्य टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शतक महोत्सवी वर्षात शालेय व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व या स्पर्धा घेण्यात आल्या. योग प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्याचा परिसारातील नागरिकांना लाभ झाला, तर मोहिनी खाडिलकर व कलाकारांनी सादर केलेला 'भावसरगम' हा भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
१९ डिसेंबर रोजी प्रा.डॉ.अलीम वकील (संगमनेर) यांचे 'भगवत गीतेतील व्यक्तीची इच्छा व ईश्वरीय इच्छा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे व प्रा.रमेश बहुगुणे हे प्रमुख अतिथी असतील. २० रोजी 'चला! जगणं समृद्ध करू या' या विषयावर जयदीप पाटील (जळगाव) यांचे व्याख्यान होईल. डॉ.अपर्णा मुठे व डॉ.नितीन पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. २१ रोजी 'कवी संमेलन' होईल. यासाठी संजय चौधरी (नाशिक), मानसी चिटणीस(पुणे), राजेंद्र उगले (नाशिक), प्रिया धारूरकर (संभाजीनगर), प्रशांत असणारे (अकोला), कृपेश महाजन (पाचोरा), भास्कर अमृतसागर (धुळे) या कवींना आमंत्रित करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ.संदीप जोशी, डॉ.रवींद्र जैन हे प्रमुख अतिथी असणार आहेत. २२ रोजी प्रसाद चाफेकर (सातारा) यांचे 'स्वराज्य पुरस्कर्ते लोकमान्य' या विषयावर व्याख्यान होईल. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व डॉ.मनीषा भावे हे प्रमुख अतिथी असतील. दि.२३ रोजी 'कोट्याधीश पु.ल.देशपांडे' या विषयावर प्रा.डॉ.प्रकाश पाठक (धुळे) हे विचार मांडतील. नीरज अग्रवाल व प्रकाश मुंदडा हे प्रमुख अतिथी उपस्थित राहतील. दि.२४ रोजी विकास नवाळे (मुख्याधिकारी, भडगाव) हे 'ढाल- तलवारी पलीकडचे छत्रपती शिवराय' या विषयावर व्याख्यान देतील. याप्रसंगी प्रा.डॉ.अरविंद फुलपगारे, हरी भिका वाणी यांची प्रमुख उपस्थिती असेल. २५ रोजी प्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) यांचे 'पर्यावरण आणि कविता' या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी डॉ.अविनाश जोशी डॉ.सुमित सुर्यवंशी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
२६ रोजी प्राचार्य डॉ.नरेंद्र पाठक (ठाणे) यांचे साहित्य, समाज आणि आपण' या विषयावर व्याख्यान होईल. तर याप्रसंगी आ.अनिल भाईदास पाटील व रामदास विठ्ठल निकुंभ (नाना) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शिक्षकवृदांसाठी विशेष व्याख्यान
लोकमान्य टिळक स्मारक समिती व खा.शि.मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २१ डिसेंबर रोजी दु.३ वा. 'मी एक विश्वस्त' या विषयावर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बाबा नंदनपवार (नागपूर) यांचे व्याख्यान होईल. गं.स.विद्यालयातील लायन्स आय.एम.ए. सभागृह येथे होईल.
या पत्रकार परिषदेस टिळक स्मारक समितीचे चिटणीस प्रा.डॉ.प्र.ज.जोशी, विश्वस्त विवेकानंद भांडारकर, आत्माराम चौधरी, लोटन पाटील यांच्यासह शतक महोत्सवी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सदस्य दिनेश नाईक, माजी प्राचार्य एस.आर.चौधरी, अनिल घासकडबी, सुरेश पवार, सोमनाथ ब्रह्मे उपस्थित होते.