जळगावातील आदर्शनगरात बंद घर फोडून पाच लाखांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:57 PM2018-12-14T12:57:19+5:302018-12-14T12:57:58+5:30
चोऱ्यांचे सत्र सुरुच
जळगाव : घर मालक मध्यरात्री पुण्याच्या दिशेने रवाना झाले आणि काही तासातच त्यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी २ लाख रुपये रोख व अडीच लाख रुपये किमतीचे ८ तोळ्याचे दागिने असा साडे चार ते पाच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर घर मालक रस्त्यातूनच माघारी फिरले.
आदर्श नगरातील प्लॉट क्र.१०/२ मध्ये हज्जन अशरफ बी अब्दुल सत्तार यांच्या मालकीच्या घरात निलेश लक्ष्मणदास दारा हे गेल्या दहा वर्षापासून भाड्याने राहतात. भजे गल्लीत त्यांनी एक हॉटेल भाड्याने घेतले आहे. मावशीच्या मुलाचे पुणे येथे गुरुवारी लग्न असल्याने निलेश हे पत्नी गिता, मुलगा क्रिश (वय १०) व मुलगी मुस्कान (वय १२) असे बुधवारी रात्री साडे बारा वाजता जळगावातून निघाले. पुणे शहराच्या मागे असतानाच त्यांना घरात चोरी झाल्याचा निरोप मिळाला.
लग्नाला न जाता फिरले माघारी
घरफोडी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर निलेश हे मावस बहिणीच्या लग्नाला न जाता रस्त्यातूनच माघारी फिरले. घरात दोन लाख रुपये रोख व ८ तोळे सोन्याचे दागिने होते, अशी माहिती निलेश दारा यांनी ‘लोकमत’ ला दिली. आपण माघारी येत असून रात्री उशिरापर्यंत शहरात पोहचू असे त्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे व सहकाºयांनी घटनास्थळी भेट दिली.
कडीकोयंडा तोडला, सामानाची नासधूस
निलेश दारा यांच्या दारात लावलेल्या झाडांचे फुल घेण्यासाठी शेजारील महिला आली असता त्यांना दारा यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला तर कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी लागलीच निलेश यांना फोन करुन माहिती दिली. घरात जावून पाहिले असता चोरट्यांनी सामानाची नासधूस केलेली होती तर कपाट व त्यातील तिजोºया उघड्या होत्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेजारील लोकांची गर्दी झाली होती.