बोहल्यावर चढण्याआधीच रिजवानवर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:44 PM2019-07-31T14:44:05+5:302019-07-31T16:37:12+5:30
बोहल्यावर चढण्याआधीच रिजवान कुरेशी याच्यावर काळाने झडप घातल्याची घटना सायगाव येथे घडली.
गोकुळ मंडळ
सायगाव, ता चाळीसगाव, जि.जळगाव : बोहल्यावर चढण्याआधीच रिजवान कुरेशी याच्यावर काळाने झडप घातल्याची घटना सायगाव येथे घडली.
चोपडा येथील रहिवाशी असलेले शेख अहेमद शेख आलम कुरेशी हे सर्वसाधारण व गरीब कुटुंब. आपल्या दोन्ही मुलांची कामाची घडी बसावी आणि सुखी जीवन जगावे हे स्वप्न उराशी बाळगून कुरेशी कुटुंब पत्नी, दोन मुले, पाच मुलींसह चोपडा येथून २५ ते ३० वर्षांपूर्वी सायगाव येथे स्थायिक झाले. रिजवान हा मोठा मुलगा. त्याचे मोबाइल रिपेअरींगचे छोटेखानी दुकान, तर लहान मुलगा जमाल याचे पिलखोड येथे गॅरेज असा दोन्ही भावडांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. दोन्ही भावंडांची आपल्या व्यवसायावर मजबूत पकड होती. वडील अहेमद कुरेशी यांनी आपला मोठा मुलगा रिजवानचे लग्न करायचे ठरविले. अशातच मालेगाव येथील शखे अस्पाक शेख शरीफ यांच्या मुलीशी लग्न जमले. दोन्ही कुटुंबांनी ठरवून २१ जुलै रोजी मालेगाव येथे साखरपुडा केला. लवकरच दोन्ही कुटुंब लग्नाची तारीख ठरविणार होते. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. ३० जुलै रोजी सकाळी रिजवानच्या छातीत दुखू लागले. कुटुंबीयांनी उपचारार्थ हलविले. मात्र त्याचा मृत्यू झाला. तो स्वभावाने अत्यंत शांत होता आणि तो सायगाव परिसरातील मित्रांचा लाडका होता. त्याच्या जाण्याने मित्रांमध्ये आणि विशेष करून घरात सर्वात मोठी पोकळी निर्माण झाली. क्षणार्धात दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
यामुळे संपूर्ण सायगाव व परिसरात स्तब्धता पसरली आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य होते, ‘हे काय झाले, असे व्हायला नको होते आणि प्रत्येक जण गोड स्वभावाचा रिजवान गेल्यामुळे हळहळत होता. शेवटी एवढेच म्हणावे लागेल, ‘अर्र्ध्यावरती डाव मोडिला अधुरी एक कहाणी....’