सत्कार टाळून परिचयाला वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:33 PM2020-01-13T22:33:57+5:302020-01-13T22:34:16+5:30
अग्रवाल समाजाचा मेळावा : १२०० विवाहेच्छुक युवक-युवतींनी दिला परिचय
जळगाव : कुठलाही सत्कार समारंभ न करता सर्व वेळ हा युवक-युवतींच्या परिचयात देऊन त्यांना त्यांच्या भावना मांडण्याची संधी अग्रवाल समाज युवक-युवती परिचय मेळाव्यात देण्यात आली़ रविवारी एका खासगी हॉटेलमध्ये हा मेळावा झाला़ यात १२०० विवाहेच्छूक युवक -युवतींनी परिचय करून दिला़
एकमेकांशी केली चर्चा
श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे करण्यात आले होते़ दीपप्रज्वलाने उद्घाटन होऊन थेट परिचयास सुरूवात झाली़ कुठलाही सत्कार व भाषणे यावेळी झाली नाही़ मुला, मुलींना मंचावर समोरा-समोर बसवून त्यांच्यात चर्चाही घडवून आणण्यात आली़ विवाह आयुष्यभराचे पवित्र बंधन आहे. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करूनच विवाहेच्छूक वधू वरांनी विवाहाचा निर्णय घ्यावा, असा विधायक हेतू या ठिकाणी मांडण्यात आला़ मेळाव्यात धुळे, नंदुरबार, मुंबई, नाशिक, नागपूर, अकोला, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, बुलढाणा, बीड यासह राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यातील विवाहेच्छूक युवक-युवती व पालक उपस्थित होते़ प्रचंड गर्दी झाल्याने सभागृह फुल्ल झाला होता़ अनेक पालक व युवक-युवती उभेच राहून मेळावा बघत होते़
अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल, पूनम अग्रवाल, राहुल अग्रवाल, अमित अग्रवाल, रुपेश अग्रवाल, महेश अग्रवाल, शाम अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, मनिष मित्तल, गोपाल अग्रवाल, किसन मित्तल आदींनी परिश्रम घेतले़ पुनम अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले़
विचारांचा आदर करणारा जोडीदार हवा
करियर ओरियंटेड व आपल्या विचारांचा आदर करणारा जोडीदार अशा अपेक्षा अनेक युवक-युवतींनी व्यक्त केल्या़ यासह एकत्रित कुटुंब पद्धती मानणारी मुलगी असावी अशी अपेक्षा मुलांनी व्यक्त केली़